ठाणे : येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असतांना शहराच्या विविध भागात पुन्हा खड्ड्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेने हे खड्डे बुजविण्यासाठी स्टार ग्रेड अॅप ही संकल्पना पुढे आणली असून त्यामध्ये आतापर्यंत ३१८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु, या अॅपवर आलेल्या तक्रारींनुसार ते बुजविले जात असून शहरातील इतर खड्ड्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गणरायाचे आगमन त्यातून होणार की काय, अशी शंका आता निर्माण झाली आहे. परंतु, गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचा दावा पालिकेने केला आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. अधूनमधून बरसणाऱ्या पावासाने शहरातील विविध भागात वारंवार खड्डे पडत आहेत. विशेष म्हणजे काही भागात त्यावर तात्पुरता मुलामा लावला जात असल्याने त्या ठिकाणी पुन्हा ते पडत आहेत. यासाठी पालिकेने स्टार ग्रेड नावाचे अॅप सुरू केले असून त्यानुसार आतापर्यंत त्यावर ३१८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये ७८ फेक तक्रारींचा समावेश आहे. ३९ तक्रारी इतर विभागांशी संबंधित असल्या तरी त्या-त्या विभागाकडे त्या पाठविल्या आहेत. परंतु, खड्ड्यांसंदर्भात सध्या केवळ ४० तक्रारी शिल्लक असल्याचा दावा केला आहे. तर, २९ तक्रारींवर कार्यवाही सुरू असून १३२ तक्रारी निकाली काढल्या आहेत. नौपाड्यातून सर्वाधिक ८६ तक्रारी आहेत.
गणरायाचे आगमन यंदाही खड्ड्यांतून होणार?
By admin | Published: September 03, 2015 2:52 AM