प्रज्ञा म्हात्रे, ठाणे: ज्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे तेथील भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आज पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे बोलत होते. ते म्हणाले की. हे सरकार बळीराजाचे आहे, शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार आहे. शेतकऱ्यांना आमचे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की, ओबीसी समाजाचा मराठा समाजाला विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाज आणि इतर समाजावर अन्याय होणार नाही. ओबीसीचे आरक्षण काढून घेतले जाणार नाही ही सरकारची भूमिका पहिल्यापासून आहे. मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यावर काम देखील सुरू आहे. कुणबी म्हणून नोंदी असताना दाखले दिले जात नव्हते ते देण्याचं काम सुरू आहे. छगन भुजबळ यांची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होता कामा नये आणि ही भूमिका सरकारची देखील कायम आहे. जुन्या जीआरची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे काम हे सरकार करत आहे.