डोंबिवली : फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा विसर पडला असताना दुसरीकडे आठवडाभरापूर्वी पश्चिमेतील ‘ह’ प्रभागात केलेल्या कारवाईत केडीएमसीच्या पथकाने फेरीवाल्यांचे वजन काटे दगडाने ठेचून तोडून टाकले होते. फेरीवाला संघटनांकडून या कृत्याचा निषेध व्यक्त होत असताना केंद्रीय मानवाधिकार संघटनेने या प्रकाराबाबत मनपाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. येत्या १५ दिवसांत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अन्यथा न्यायालयात खटला दाखल केला जाईल, असा इशारा दिला आहे.
कोरोनाकाळात फेरीवाल्यांना अत्यंत हलाखीचे दिवस काढावे लागत आहेत. सर्व निर्बंध पाळूनही मनपाच्या कारवाई पथकाकडून फेरीवाल्यांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास देण्यात येत आहे. पथकातील कर्मचारी हे स्वत:च्या अधिकाराचा दुरुपयोग करून बेकायदा अन्यायकारक कारवाई करीत असल्याकडे नोटिशीत लक्ष वेधण्यात आले आहेत. पथकाकडून राजरोस दमदाटी, हप्तावसुली केली जात असल्याचा आरोपही यात केला आहे. रस्त्यावर नागरिकांच्या देखत अशांतता पसरेल, असे वर्तन केले जाते व फेरीवाले यांच्या वस्तूंचे अतोनात नुकसान केले जाते. यात फेरीवाल्यांना त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या सन्मानाला आणि प्रतिष्ठेलाही ठेच पोहोचत आहे. या गैरकृत्याबाबत पथकातील संबंधित कर्मचारी अधिकारी यांची चौकशी करावी, शिस्तभंगाची कारवाई व्हावी तसेच हप्तेखोरीबाबतही ठोस कारवाई व्हावी, अशा आशयाची नोटीस बजावल्याची माहिती केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या उपाध्यक्षा अश्विनी केंद्रे यांनी दिली. ॲड. अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यामार्फत केडीएमसी आणि ठाणे पोलीस यांना नोटीस दिल्याचे त्यांनी सांगितले.
फेरीवाल्यांविरोधात झालेल्या कारवाईप्रकरणी कल्याण फेरीवाला संघर्ष समिती आणि शिवगर्जना भाजी, फळे विक्रेता व हॉकर्स युनियनने आधीच संघर्षचा इशारा दिला आहे. त्यात आता केंद्रीय मानवाधिकार संघटनेने नोटीस दिल्याने याला प्रशासन काय उत्तर देते, याकडे लक्ष लागले आहे.
...तर नोटिशीला उत्तर दिले जाईल
‘त्या’ कारवाईप्रकरणी अद्याप आम्हाला कोणाचीही नोटीस मिळालेली नाही. ती मिळाल्यास त्याला योग्य ते उत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया केडीएमसी ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांनी ‘लोकमत’ला दिली.
----------------