लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : गेली २५ वर्षे आपल्या आदेशाभोवती मीरा-भार्इंदरचे राजकारण फिरत ठेवणारे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा मोठ्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी शिवसेनेत गेले. पण आजवर आपल्या आदेशावर इतरांना नाचवणारे मेंडोन्सा आदेशाची संस्कृती असलेल्या शिवसेनेत इतरांच्या आदेशानुसार काम करत रमतील का, अशी चर्चा त्या पक्षातील काही नाराजांनी सुरू केली आहे. पाऊण शतकात भल्याभल्यांना नामोहरम करणाऱ्या मेंडोन्सा यांच्या राजकारणाचा, त्यांच्या दबदब्याचा शिवसेनेला या पालिका निवडणुकीत नक्की फायदा होईल. राष्ट्रवादीत फारसा जीव उरलेला नसल्याने तो पक्ष आणि काँग्रेस एकत्र येतील आणि त्यांच्याशी मेडोंन्सा यांच्या असलेल्या चांगल्या संबंधांचा सेनेला फायदा होईल, असे मानले जाते.सुरुवातीला भाजपा, नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी असे राजकीय वळसे घेणारे मेंडोन्सा शिवसेनेत दाखल झाले. मातोश्रीवर मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नगरसेवक आणि माजी महापौर असलेली मुलगी कॅटलिन परेरा, मुलगा नगसेवक वेंचर मेंडोन्सा यांच्यासह प्रभाग समितीचे सभापती बर्नड डिमेलो, नगसेवक भगवती शर्मा, नगरसेविका हेलन गोविंद जॉर्जी, गणेश नाईक यांचे समर्थक व पालिकेच्या परिवहन समितीचे माजी सभापती शांताराम ठाकूर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र ठाकूर यांच्यासोबत त्यांनी शिवबंधन बांधले. सुरुवातीला डंपरचालक असलेले मेंडोन्सा यांनी ग्रामपंचायत काळात पहिली निवडणुक लढविली आणि सरपंच झाले. पुढे त्यांना भार्इंदर पश्चिम ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, राजस्थानचे माजी खासदार तथा विद्यमान महापौर गीता जैन यांचे सासरे मिठालाल जैन यांच्याकडून राजकीय डावपेचाचे प्रशिक्षण मिळाले. १९८८-८९ मध्ये नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर मेंडोन्सा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. ४८ पैकी ३८ जागा काँग्रेसला मिळाल्या. यावेळी काँग्रेसचे परशुराम पाटील व मेंडोन्सा यांच्यात नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच होती. पण डावपेचात मेंडोन्सा वरचढ ठरले आणि राजकारणासह एकंदर सत्ताकारण, अर्थकारणावर त्यांचा दबदबा, दहशत निर्माण झाल्याने त्यांना डॉन, शेठ अशी ओळख मिळाली. वर्चस्वासाठी त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांचे पंख छाटताना पहिला बळी राजकीय गुरु मिठालाल जैन यांचा दिला. नगरपालिकेतील अजित पाटील या अधिकाऱ्याने मेंडोन्सा यांना टक्केवारीची गणिते शिकवली. एका कंत्राटदाराचे थकीत बिल देण्यासाठी मागितलेल्या ३० हजारांच्या लाचेचे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेले. त्यात पाटील सापडला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मेंडोन्सांसह तेव्हाचे मुख्याधिकारी लक्ष्मणराव लटके व लेखापाल श्रीकांत मोरे यांची नावे घेतली. अटक केल्यानंतर झालेल्या चौकशीत मेंडोन्सा दोषी आढळल्याने त्यांच्यावर १९९३ मध्ये खटला चालला. १९९५ मध्ये युती सरकारने मेंडोन्सा यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवून नगरपालिका बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. २००२ मध्ये महापालिका होताच मेंडोन्सा राष्ट्रवादीत गेले. गणेश नाईकांशी त्यांचा संघर्ष झाला.पण पत्नी मायरा यांना त्यांनी महापौरपद दिले. २००७ च्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्याने काँग्रेसने राष्ट्रवादीला सोबत घेण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या मेंडोन्सा यांनी अपक्ष नगरसेवक व सध्याचे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह बहुजन विकास आघाडीची मोट बांधून सत्ता काबीज केली. मेहता यांना महापौरपद दिले. पुढेही त्यांचे हे फोडाफोडीचे राजकारण सुरू राहिले. २०१५ मधील आमदारकीच्या निवडणुकीत सपाटून मार खाताच त्यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का बसला. स्वपक्षातील नेत्यांनी सहकार्य न केल्याचा घाव वर्मी लागल्याने त्यांनी गेल्यावर्षी पक्षबदलाचा निर्णय घेतला.
मेंडोन्सा आदेशात रमतील?
By admin | Published: June 21, 2017 4:42 AM