ठाणे : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिकेबरोबर आता सर्वच पक्षांनी जबाबदारी उचलली आहे. पालिकेने विविध स्वरूपाच्या जाहिराती, बॅनर, पोस्टर आदींच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. विविध पक्षांनी आपल्या हक्काच्या मतदारांना बाहेर काढण्यासाठी कंबर कसली आहे. परंतु, एवढे करून मागील वेळी ज्या पद्धतीने मतदानाचा टक्का घसरला होता, तो वाढवला जाईल का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.ठाणे महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता मतदारराजा कोणाच्या झोळीत आपले मत टाकणार की, बाहेर निघणारच नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे. उल्हासनगर, मुंबईत काही हॉटेलवाल्यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जेवणाच्या बिलात सवलती दिल्या आहेत. ठाण्यात तशी परिस्थिती नसली तरीदेखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महापालिकेने पथनाट्ये, फिरता रथ, बॅनर, जाहिराती आणि पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. त्यानुसार, यंदा मतदानाचा खालावलेला टक्का वाढेल, अशी आशा महापालिकेला आहे. दरम्यान, यंदा ३३ प्रभागांतून १३१ जागांसाठी ८०५ उमेदवार रिंगणात असून या वेळी १२ लाख २९ हजार २६६ मतदार मतदान करणार असून त्यामध्ये ६ लाख ६७ हजार ८६८ पुरुष आणि ५ लाख ६१ हजार ३८५ महिला मतदार आणि १५ इतर मतदार आहेत. परंतु, त्यातील किती मतदार आता मतदानाचा हक्क बजावणार, याकडे लक्ष लागले आहे. मागील म्हणजेच २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा मागोवा घेतल्यास त्या वेळेस ५३.२५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यामध्ये एकूण ११ लाख ९४ हजार ८८६ मतदारांपैकी ६ लाख ३६ हजार २८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. परंतु, २००७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ५६.५७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानुसार, २०१२ मधील मतदानाचा टक्का हा साडेतीन टक्कयांनी घटला होता. एकीकडे मतदाराला बाहेर काढण्यासाठी पालिकेने तयारी केली असली, तरी विविध पक्षांनीदेखील यासाठी विशेष अशा मोहिमा हाती घेतल्या आहेत. (प्रतिनिधी)
मतदानाचा टक्का वाढणार का?
By admin | Published: February 21, 2017 5:46 AM