अनिकेत घमंडी ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : लोकलमधील गर्दीची माझी मुलगी बळी ठरली आहे. माझ्यावर ओढवलेला प्रसंग यापुढे कुठल्याही मातापित्यावर येऊ नये. या अपघातानंतर तरी रेल्वेला जाग येणार का? असा संतप्त सवाल रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या चार्मीची आई चंद्रिका पासड यांनी केला. आमचे नुकसान कधीही भरून निघणार नाही. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याण-वाशी, कल्याण-पनवेल या मार्गांवर लोकल सुरू कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.अनेक वर्षांपासून डोंबिवलीतून जादा लोकलची मागणी रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे केली जात होती. मात्र, या मागणीला नेहमीच केराची टोपली दाखवली जात असल्यामुळेच आमची मुलगी गमावल्याचा आक्रोश चंद्रिका यांनी केला. चार्मीच्या मृत्यूची दखल रेल्वेने घेतली असली, तरी डोंबिवली स्थानकातून महिला विशेष लोकल सोडण्यात येईल, तेव्हाच आमचे समाधान होईल. महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे. रोजच कुठेना कुठे गर्दीमुळे अपघात होऊ न जखमी किंवा मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. महिलांसाठी प्रथम श्रेणी पकडून चारच डबे आहेत. ही एक प्रकारे थट्टाच आहे, असे त्या म्हणाल्या. मुलगी घरी आलेली पाहिल्याशिवाय आम्ही जेवत नव्हतो. आता आमच्या घशाखाली घासही उतरत नाही, असे सांगताना पासड यांना रडू कोसळले.जेव्हा ब्रिटिशांनी रेल्वे सुरू केली, तेव्हा महिलांसाठी एखादाच डबा असे. मात्र, १०० वर्षांनंतरही त्यांचे अवघे दोनतीनच डबे झाले. पूर्वी महिला नोकरी, शिक्षणासाठी फार दूर जात नव्हत्या. पण, आता परिस्थिती बदलली आहे. लाखोंच्या संख्येने महिला घराबाहेर पडतात, याचा विचार रेल्वे करणार आहे की नाही? रेल्वेने महिला डबे वाढवायला हवेत, जेणेकरून कुणाला आपली मुलगी, बहीण गमवावी लागणार नाही.- मेहुल पासड, चार्मीचा भाऊशिवसेनेकडून सांत्वनशिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी बुधवारी पासड कुटुंबीयांची भेट घेऊ न त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी नवनीतनगर येथील पासड यांच्या घरी गुजराती समाजाचे जयंती गड्डा, कमलेश शहा, बब्बूभाई शहा, भावेश शहा, अमोल पाटील आदी उपस्थित होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे महिला विशेष लोकल, १५ डब्यांची लोकल आदी मागण्या कराव्यात, अशी मागणी चार्मीच्या कुटुंबीयांनी यावेळी केली.अपघात झाल्यापासून चार्मीचा फोटो छातीला कवटाळून त्या सांत्वनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला माझ्या मुलीचा काय दोष होता, असा सवाल करत आहेत. हसतमुख कामावर गेलेल्या चार्मीच्या मृत्यूनंतर आनंदाने भरलेले आमचे कुटुंब दु:खात बुडाले आहे. रेल्वे प्रशासनाने चार्मीच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, असे मत रीटा मारू, जयंती गड्डा, कमलेश शहा यांनी व्यक्त केले.
माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर तरी जाग येणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:51 AM