टिटवाळा : कल्याण तालुक्यातील उल्हासनदीच्या किनारी असलेले आने गावात पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे पूराचे पाणी गावात शिरून मोठ्या प्रमाणात गावाचे नुकसान होत असते. या गावाचे लगतच्याच परिसरात योग्य जागी स्थलांतर करून पुनर्वसन करणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.
उल्हासनदी ही कल्याण तालुक्यातील कल्याण नगर या महामार्गावरील रायते, आने, कांबा, वरप व म्हारळ या गावा जवळून वाहत आहे. यामुळे या गावांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पूराचा फटका सहन करावा लागतो. उल्हासनदीला थोडासा पूर आला तरी नदीचे पाणी आने गावात शिरते. यामुळे या गावातील शेतीचे, घरांचे व लोकांच्या इतर सामानाचे दरवर्षी अतोनात नुकसान होत असते. आने गावाची लोकवस्ती जवळ जवळ तीनशेहून अधिक आहे. या गावात ४५ ते ५० घरे आहेत.यावर्षी २६ , २७ व २८ जुलै तसेच ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान उल्हास नदीला पूर आल्याने गावात पूराचे पाणी शिरले होते. वारंवार पावसाळ्यात पूराचे पाणी येत असल्याने नागरिक कमालीचे हतबल झाले आहेत. यंदाच्या पूर स्थितीची पाहणी करत असतांना आमदार किसन कथोरे यांनी या गावाची व्यवस्थीत पाहणी केली. त्यावेळी ग्रामस्थांनी गावच्या स्थलांतराची मागणी कथोरे यांच्याकडे केली होती.त्यानुसार या गावाचे स्थलांतर करण्यासाठी किसन कथोरे यांनी महसूल प्रशासनास सूचना केल्या आहेत. लवकरच या बाबतच्या हालचालींना वेग येणार असलयाचे समजते. पूढल्या वर्षीच्या पूराचा सामना न करावा लागणार असल्याने आने गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.