कल्याण : केडीएमसीच्या स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांचा कार्यकाळ संपल्याने या पदासाठी जानेवारीतील सभेत निवडणूक अपेक्षित आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाच्या वाटाघाटीनुसार आता भाजपाचा सभापती विराजमान होणार आहे. मात्र, सभापतीपदावर शिवसेनेने पुन्हा दावा सांगितला आहे. त्यामुळे शिवसेनेने भाजपाला ठेंगा दाखवण्याची तयारी सुरू केली आहे.केडीएमसीच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये झालेल्या समझोत्यानुसार स्थायी समितीचे सभापती आलटूनपालटून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, सभापतीपदी प्रथम भाजपाचे नगरसेवक संदीप गायकर यांची वर्णी लागली होती. त्यानंतर, शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे विराजमान झाले. त्यांच्या या कार्यकाळातील शेवटची सभा शनिवारी होत आहे. त्यानंतर, आता सभापतीपद पुन्हा भाजपाला मिळणार आहे. मात्र, सभापतीपदावर शिवसेनेने दावा सांगितला आहे.मुंबई आणि ठाणे महापालिकांत शिवसेनेची भाजपाने कोंडी केली होती. असे असतानाही या महापालिकांमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकला. त्यानंतर, पुन्हा भाजपा तेथे शिवसेनेला अडचणीत आणण्याची संधी सोडत नाही. त्याचा वचपा काढण्याची संधी केडीएमसीच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना सोडणार नाही. ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे. अशा परिस्थितीत स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार उभा करणार असून दीपेश म्हात्रे हे प्रबळ दावेदार आहे. तसेच जयवंत भोईर हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपाचे टेन्शन वाढणार आहे.दुसरीकडे भाजपाकडून सभापतीपदासाठी राहुल दामले हे प्रबळ दावेदार आहेत. मनोज राय हे देखील इच्छुक आहेत. दामले यांचे पक्षश्रेष्ठींशी चांगले असल्याने शिवसेना युतीधर्म पाळणार आहे. त्यामुळे भाजपाला टर्म मिळणार, यात काही वाद नाही. सभापती कोण होईल, याचा निर्णय भाजपाचे पक्षश्रेष्ठी घेतील, असे दामले म्हणाले. ज्येष्ठतेनुसार दामले यांचा प्रथम नंबर लागतो. राय हे एमसीएचआय या बिल्डर संघटनेचे अध्यक्ष आहेत. महापालिकेच्या चुकीच्या कारभारावर परखड भाष्य करणारे म्हणूनही ते परिचित आहेत. भाजपातून संदीप पुराणिक यांचेही नाव चर्चेत आहे. ते राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांचीही वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.>...तर सोडत पद्धतीने निवडस्थायी समितीत शिवसेनेचे आठ सदस्य आहेत. त्यामुळे शिवसेनेला कोणची मते फोडण्याची गरज भासणार नाही. भाजपाला अद्दल घडवायची असल्यास शिवसेना मनसे व काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य घेऊन भाजपाचा पराभव सहज करू शकते. भाजपाने मनसे व काँग्रेस सदस्यांची मदत घेतली, तर त्यांचे संख्याबळ आठ होते. शिवसेना व भाजपा आठआठ सदस्य झाल्यास विद्यमान सभापतींचे निर्णायक मत घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्यथा, सोडत पद्धतीने सभापती चिठ्ठी टाकून निवडला जाण्याची शक्यता आहे. चिठ्ठी कोणालाही तारू शकते, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
शिवसेनेचा भाजपाला ठेंगा?, भाजपाची टर्म असतानाही सेना उमेदवार उभा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 3:02 AM