ठाणे : ठाणे महापालिका आता हॅप्पीनेस इंडेक्स अंतर्गत समाजातील प्रत्येक घटकाचा हॅप्पीनेस इंडेक्स उंचाविण्याच्या दृष्टीकोनातून पाऊले उचलत आहे. त्यानुसार आता ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील शाळा क्रमांक ९ मध्ये विशेष अंध शाळा सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रशासकीय व वित्तीय मान्यतेचा प्रस्ताव १९ जूनच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.ठाणे महापालिका हद्दीपासून २० किमी अंतरावरही अशा प्रकारची विशेष अंधशाळा उपलब्ध नसल्याने पालकांना त्यांच्या पाल्यांचा शैक्षणिक विकास घडविण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालिकेने हे पाऊल उचलले आहे. या योजनेअंतर्गत महापालिकेच्या प्राथमिक शाळा क्रमांक ९ राऊत शाळा या इमारतीत ही शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेच्या १२ ते १८ पट असल्याने ही शाळा बंद करून शाळा क्रमांक ३४ च्या इमारतीमधील वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना हलविण्यात येणार आहे. दरम्यान, या विशेष अंधशाळेत किमान ३० मुलांना वयानुरूप प्रवेश देण्यात येणार आहे. या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. यामध्ये गणवेश, शैक्षणिक साहित्य, मध्यान्ह भोजन, ब्रेल किट, ब्रेल बुक, आॅडिओ बुक, अंधकाठी आदी साहित्यही उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या शाळेला शासनाकडून मान्यता मिळणार नसल्याने ही शाळा कायम विनाअनुदानित तत्वावर महापालिकेच्या निधीतून सुरु करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडूनही कोणतेही अनुदान अथवा निधी दिला जाणार नाही. त्यामुळे यासाठी होणारा खर्च पूर्णपणे हा पालिकेला उचलावा लागणार आहे.त्यातही कमी पटसंख्येमुळे शाळा बंद पडल्यास तेथील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करताना नागपूर जिल्हा परिषदेने प्रवासभत्ता दिलेला आहे. त्याच धर्तीवर भविष्यात पटसंख्या वाढण्याच्या दृष्टीने अंधविद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून शाळेत येण्याकरीता प्रतिवर्षी ६ हजार रूपये प्रवास भत्ता दिला जाणार आहे. त्यानुसार एकूण ३० विद्यार्थ्यांसाठी एक लाख ८० हजार इतका वर्ष अपेक्षित धरण्यात आला आहे.पाच शिक्षक नेमणारअंध विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी एक मुख्याध्यापक व चार विशेष अंधप्रवर्ग शिक्षक अशी एकूण पाच शिक्षकांची १० महिन्यांकरिता नियुक्ती केली जाणार आहे. दोन मदतनीस आणि एक लिपिक ही पदेही जाहिरातीद्वारे भरली जाणार आहेत. याशिवाय इतर खर्चही केला जाणा आहे. या प्रकल्पासाठी एकूण २८ लाख ३२ हजार ३४९ रुपयांचा खर्च केला जाणार आहे. अनुकंपा तत्वावर नियुक्त केलेले एक लिपिक (१७,६४०) व मदतनीस मानधन (प्रती १५,०१५) प्रमाणे देण्यात येणार आहे.
ठामपा सुरू करणार अंधशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:38 AM