भिवंडी : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात भिवंडीत शाहीनबाग आंदोलन सुरू असतानाच, या कायद्याविरोधात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची २७ फेब्रुवारीला आयोजित केलेली जाहीर सभा होऊ न देण्याचा इशारा भाजपने दिला आहे. चौकाचौकात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नेमून ओवेसींची नाकाबंदी करण्याचा इशाराही भाजपने रविवारी पत्रकार परिषदेत दिला.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून फसवणूक केल्याचा भाजपचा आरोप आहे. महिलांवर अत्याचार होत असून, याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी भाजप जिल्हा शाखेच्यावतीने उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, याची माहिती देण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष नगरसेवक संतोष शेट्टी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.भिवंडी शहर हे संवेदनशील असून, येथे सर्वधर्मसमभावाचे वातावरण आहे. असे असताना नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात एकत्र येऊन काही जण शाहीनबागच्या माध्यमातून आंदोलन करीत आहेत. अशातच ओवेसी भिवंडीत आल्यास शहरातील वातावरण गढूळ होऊ नये, यासाठी त्यांच्या सभेस परवानगी नाकारण्याची मागणी आपण पोलिसांकडे करणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. एमआयएमचे नेते वारीस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. अशातच भिवंडी येथील नियोजित सभेत ओवेसी गरळ ओकण्याचे काम करून वातावरण बिघडवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप ओवेसींनी शहरात येण्यापासून रोखणार असल्याचे शेट्टी म्हणाले.
‘भिवंडीतील ओवेसींची जाहीर सभा रोखणार’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 11:32 PM