उल्हासनगर- पप्पु कलानी यांनी आज कॅम्प नं-५ गांधी रोड कुलदेवी मंदिरासमोरील पारस इमारतीच्या दूर्घटनेत मृत्यू झालेल्या आकाश पोपटानी यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी इमारतीतील बेघर झालेल्या नागरिकांसोबततही सवांद साधत इमारतीच्या पुनर्बांधणीचे आश्वासन दिले आहे. यावेळी त्यांचे समर्थकही त्यांच्यासोबत होते.
उल्हासनगर कॅम्प नं-५ कुलदेवी मंदिरासमोरील पाच मजली पारस इमारतीमधील प्लॅट नं-५०३ चा स्लॅब चौथ्या मजल्यावर पडून आकाश पोपटानी या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. या घटनेमुळे इमारतीमधील नागरिकांत भितीचे वातावरण आहे. राजकीय नेत्यांसह महापालिका अधिकारी, आमदार बालाजी किणीकर, खासदार श्रीकांत शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त पारस इमारतीला भेट देऊन शासनस्तरावर मदत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान माजी आमदार पप्पु कलानी यांनी समर्थकांसह पारस इमारतीला भेट देऊन दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आकाश पोपटानी यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच रहिवाशांना इमारतीच्या पुनर्बांधणीचे आश्वासन देऊन दिलासा दिला.
शहरात एका वर्षात अनेक इमारतीचे स्लॅब पडून हजारो जण बेघर झाले. तर दोन इमारतीच्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून राज्य शासनाने अद्यापही मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली नसल्याची टीका शहरातून होत आहे. महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून ज्या इमारतीचे स्लॅब पडले, त्या इमारती खाली केल्याने, हजारो नागरिक बेघर झाले. यांपैकी अनेकांनी नातेवाईकांचा आश्रय घेतला आहे. तर इतरांनी भाड्याच्या खोल्यात जाणे पसंत केले. इमारतीची पुनर्बांधणी होऊन हक्काचे घर मिळेल, या आशेवर हजारो नागरिकांची नजर शासन व महापालिकेच्या धोरणाकडे लागली आहे. महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून १० वर्ष जुन्या हजारो इमारतीला नोटीस पाठवून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास बजावले आहे.
कलानीवर नागरिकांनी दाखवला विश्वास -पप्पु कलानी यांनी दुर्घटनाग्रस्त पारस इमारतीची पाहणी करून इमारतीमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी कलानी यांनी इमारतीच्या पुनर्बांधणीचे आश्वासन दिल्यावर, राहिवाश्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पप्पु कलानी यांच्या शब्दावर आमचा विश्वास असल्याची प्रतिक्रियाही रहिवाशांनी दिली.