कल्याण : कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडीवर सहा पदरी पूल तयार करण्याचे काम एमएमआरडीए खाजगी कंत्राटदारामार्फत करत आहे. या पुलावरील तीन लेन मे २०२० अखेर पूर्ण करण्याची डेडलाइन एमएमआरडीएसह कंत्राटदाराने आखून घेतली आहे. तसेच उर्वरित तीन लेनचे काम डिसेंबर २०२० अखेर पूर्ण करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मे २०२० पासून पूल परिसरातील वाहतूककोंडी फुटण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
सध्याचा दुर्गाडी खाडी पूल हा दुपदरी असल्याने वाहतूककोंडी होत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आॅगस्ट २०१६ मध्ये नवीन सहा पदरी पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. हे काम सुप्रिमो कंपनीला दिले होते. मात्र, कामातील दिरंगाई व खाडीतील पुलाचे गाळे चुकीचे घेतले गेल्याने पुन्हा त्याला मंजुरी घेण्यात कंपनीचा बराच काळ खर्ची झाला. त्यामुळे कंपनीचे कंत्राटद रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. टी अॅण्ड टी कंपनीला हे काम दिले गेले. या कंपनीने कामात वेगही घेतला होता. मात्र जुलै, आॅगस्टमधील अतिवृष्टीत त्यांची साधनसामग्री पाण्यात वाहून गेल्याने कामाला पुन्हा विलंब झाला.
कल्याण पश्चिमेचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विधानसभा निवडणुकीत दुर्गाडी खाडी पुलाचे काम मार्गी लावण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी पुलाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी पाहणीदौरा केला. यावेळी एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता जयवंत ढाणे, शिवसेनेचे नगरसेवक सचिन बासरे, सुधीर बासरे, पदाधिकारी रवी पाटील, शरद पाटील, रवींद्र कपोते, महिला आघाडीच्या विजया पोटे आदी उपस्थित होते. ढाणे म्हणाले की, आधीचा कंत्राटदार बदलून नवी प्रक्रिया राबवावी लागली. त्यानंतर अतिवृष्टीचा पुलाच्या कामाला फटका बसला. पुलाचे खांब खाडी पात्रात टाकताना काही ठिकाणी आठ मीटर खोल तर, काही ठिकाणी १६ मीटर खोल जावे लागले.
आता कामाने गती घेतली आहे. मे २०२० अखेरपर्यंत सहा लेनपैकी तीन लेनचे काम पूर्ण केले जाईल. उर्वरित ३ लेनचे काम डिसेंबर २०२० पर्यंत केले जाणार आहे. सध्याचा खाडी पूल हा दुपदरी आहे. नवीन पूल सुरू झाल्यावर आठ लेन वाहतुकीसाठी मिळतील. मात्र, शीळ-कल्याण-भिवंडी रस्ता हा चार पदरी आहे. तो सहा पदरी करण्याचे काम सुरू आहे. कोनच्या दिशेने पुलाला जोडणारा रस्ता सध्या चार पदरी असला तरी दोन पदरी रुंदीकरण सुरू आहे.
पोहोच रस्त्यासाठी भूसंपादन नाही
सहा पदरी पुलाचे काम डिसेंबर २०२० अखेर पूर्ण होईल. परंतु, कोनच्या दिशेने पुलाच्या पोहोच रस्त्यासाठी अद्याप भूसंपादन झालेले नाही. त्याची प्रक्रिया आताच पूर्ण करणे अपेक्षित आहे. अन्यथा सहा पदरी पूल तयार झाल्यावर पोहोच रस्त्याचा प्रश्न प्रलंबित राहिला तर पुन्हा वाहतूककोंडीचा प्रश्न तेथे उद्भवण्याची शक्यात असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.