प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केंद्र सरकारने वाहन स्क्रॅप धोरण लागू केले आहे. त्यानुसार १५ वर्षांपेक्षा जास्त जुनी खासगी आणि १० वर्षांपेक्षा जास्त जुनी व्यावसायिक वाहने वापरायोग्य नसतील, प्रदूषण होत असेल, तर अशा वाहनांची फेरनोंदणी न करता ती भंगारात काढली जाणार आहेत. वाहने भंगारात काढल्यास नवीन वाहन घेतले जाईल, यात प्रदूषण कमी होईल, इंधनाची बचतही होईल यासह अन्य मुद्यांकडे लक्ष वेधले जात आहे. गाडी चांगली असल्यास फिटनेस सर्टिफिकेट मिळणार आहे. दरम्यान, जाहीर केलेल्या धोरणानुसार वाहने तपासणीत अपात्र ठरल्यास वाहने थेट भंगारात टाकली जाणार आहेत. तुम्ही वापरत असलेले जुने वाहन अनफिट असेल तर ते या धोरणानुसार भंगारात काढले जाऊ शकते.
कल्याण आरटीओ हद्दीत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड आदी परिसर येतो. शहरीकरणात वाहनांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. आरटीओ हद्दीत आठ लाख ११ हजार ६३५ वाहने आहेत. यात भंगार वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या धोरणानुसार विहित मुदतीनंतर तपासणीत अपात्र ठरलेली वाहने थेट भंगारात टाकली जाणार आहेत.
-----------------------------------
गाडी चांगली असल्यास मिळणार फिटनेस सर्टिफिकेट
केंद्राच्या नव्या धोरणानुसार वाहनांची फिटनेस चाचणी आणि स्क्रॅपिंग अनुषंगाने रस्त्यावर धावणारे वाहन हे सुस्थितीत असल्यास फिटनेस सर्टिफिकेट दिले जाणार आहे. अवजड वाहनांची फिटनेस चाचणी १ एप्रिल २०२३, तर इतर वाहनांची फिटनेस चाचणी १ जून २०२४ पासून टप्पाटप्प्याने लागू होणार आहे.
-------------------
भंगारात दिल्यास मिळणारा लाभ - १५ टक्के
नवीन धोरणानुसार वाहन स्क्रॅप करायला दिले तर १५ टक्के लाभ मिळणार आहे. जुने वाहन भंगारात दिल्यास नवीन वाहन खरेदीवर कंपनीसह सरकारकडून करांसह किमतीतही सूट दिली जाणार आहे.
-------------------------------------
मोठ्या संख्येने धावतात भंगारातील वाहने
कल्याण आरटीओ हद्दीत आठ लाखांहून अधिक वाहने आहेत. यातील लाखभर वाहने तरी भंगारातील असतील. आपत्तीत, अपघातात सदोष ठरविलेली वाहनेही आजच्या घडीला रस्त्यावर धावत आहेत. दरम्यान, याची स्वतंत्र नोंद कल्याण आरटीओकडे नाही. केंद्राने धोरण जाहीर केले आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर भंगार वाहनांचा डेटा संकलित करण्यात येणार असल्याचे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आले.
---------------------
नियमावली आलेली नाही
केंद्राने धोरण जाहीर केले आहे; पण अद्याप आमच्यापर्यंत नियमावली आलेली नाही. राज्य सरकार आणि वरिष्ठांकडून नियम आल्यावर तातडीने अंमलबजवाणी केली जाईल. वाहनधारकांकडून वाहन तपासणीसाठी दिल्यावर त्याप्रमाणे तपासणीअंती फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते ही कार्यवाही आजही सुरू आहे.
- तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण
---------------------------