भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेत कंत्राटावर सुमारे २ हजार ४३० सफाई कामगार आहेत. त्यांना दरमहिन्याच्या ७ ते १० तारखेला वेतन देण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाने उपकंत्राटदारांना दिले आहेत. असे असतानाही काही महिन्यांपासून कामगारांना १८ ते २५ तारखेदरम्यान वेतन दिले जात असल्याने आम्हाला वेतन वेळेवर द्या, अशी मागणी कामगारांनी श्रमजीवी कामगार संघटनेच्या माध्यमातून पालिकेकडे केली आहे. पालिकेच्या स्वच्छता विभागांतर्गत सुमारे २२०० व उद्यान विभागांतर्गत सुमारे २३० सफाई कामगार आहेत. पालिकेने शहरातील सफाईसाठी ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीला कंत्राट दिले आहे. या मूळ कंत्राटदाराला २०१२ मध्ये दिलेले सफाईचे कंत्राट काही महिन्यांत संपणार आहे. तत्पूर्वी स्थानिक कंत्राटदारांकडून शहराची सफाई केली जात होती. ग्लोबल कंपनीला नियुक्त केल्यानंतर स्थानिक कंत्राटदारांनी सफाईचे उपकंत्राट मिळवले. या उपकंत्राटाच्या माध्यमातून सुमारे २६ उपकंत्राटदार नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडून कामगारांना किमान वेतनाचा लाभ मिळत नसल्याने कामगारांनी छेडलेले सफाईबंद आंदोलन सत्ताधारी व प्रशासनाच्या जिव्हारी लागले. त्यामुळे त्यांनी उद्यान विभागातील सुमारे ५० कामगारांना कामावरून कमी केले. याखेरीज सफाई विभागात सुमारे ६५० व उद्यान विभागात सुमारे १५ खाडाबदली सफाई कामगार रोजंदारीवर काम करीत आहेत. या सर्व कामगारांना उपकंत्राटदारांकडून दिवसाला सुमारे ५८६ रुपये वेतन दिले जाते. हे वेतन प्रतिदिवसाऐवजी महिन्यातील हजेरीनुसार दिले जाते. ते महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान कामगारांना मिळणे अपेक्षित असतानाही १८ ते २५ तारखेदरम्यान दिले जाते. जानेवारीचे वेतनही अद्याप दिलेले नाही. यातच पालिकेने सफाई विभागांतर्गत औषधफवारणीसाठी नव्याने सुमारे ५० कामगारांची भरती केली आहे. यात पाच वर्षांपासून काम करीत असलेल्या खाडाबदली कामगारांसह उद्यान विभागातून कमी केलेल्या कामगारांना सामावून न घेता प्रशासनाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. संतप्त कामगारांनी श्रमजीवीच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारला असता प्रशासनाने पुन्हा वेळेवर वेतन देण्यासह नवीन कामगार भरतीत खाडाबदली व कमी केलेल्या कामगारांना प्राधान्य देण्याचे आश्वासन कामगारांना देऊन त्यांची बोळवण केली. (प्रतिनिधी)
आम्हाला, वेतन वेळेत मिळणार का?
By admin | Published: February 16, 2017 1:56 AM