लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : घरामध्ये दिवाबत्ती नाही, पाण्याचा थेंब नाही, घरे मोडकळीस आली आहेत आणि कधीही बुलडोझर फिरवून उरलासुरला निवारा नष्ट केला जाईल, ही भीती, अशा अवस्थेतही हाडामासाची काही माणसं आपल्या हक्काकरिता लढत आहेत, घरे सोडायला तयार नाहीत. कुणाच्या नवऱ्याने आपल्या हक्काच्या पैशांकरिता टाचा घासून आत्महत्या केली, तर कुणी अन्नान दशा सोसत मरण पावला. ही व्यथा आहे एनआरसी कंपनीतील कामगारांच्या कुटुंबांची. अदानी उद्योगाने ही कंपनी खरेदी केली आहे. या कामगारांनी घरे सोडावीत, याकरिता दिवा-पाणी तोडले आहे. त्यामुळे उद्विग्न झालेल्या कमल शाहू डोंगरे या साठीच्या महिलेने सवाल केला की, आम्ही माणसं नाहीत का? आम्ही मेल्यावर आम्हाला आमची देणी देणार आहात का? हे बोलताना त्या अक्षरश: रडत होत्या.
एनआरसी कंपनीपासून जवळच असलेल्या जेतवनगर टेकडीवर एका साध्या घरात राहणाऱ्या कमल शाहू डोंगरे यांचे पती शाहू हे १९७२ साली कामाला लागले. अनेक वर्षे ते कायमस्वरुपी कामगार नव्हते. शाहू यांना तीन मुले आणि पत्नी कमल असा परिवार होता. शाहू यांना दहा हजार रुपये पगार होता. कंपनी २००९ साली बंद झाली. शाहू यांनी कर्ज काढले होते. घराचा खर्च कसा चालवायचा आणि घेतलेले कर्ज कसे फेडायचे, याचे टेन्शन त्यांना होते. कंपनीकडून थकीत देणी मिळत नसल्याने शाहू यांनी कंपनीच्या आवारातील आर. एस. इमारतीच्या मजल्यावरून उडी मारून २०१२ साली आत्महत्या केली. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी कमल यांना कंपनीकडून दरमहा केवळ एक हजार रुपये पेन्शन मिळते. त्यांच्या तीन मुलांपैकी दोन मुले रिक्षा चालवितात. एक मुलगा पुण्याला आहे. मुलांचे त्यांच्याच कमाईत भागत नसल्याने कमल यांच्यावर एकटे जीवन जगण्याची वेळ आली आहे. स्वत:चे पोट भरण्यासाठी दिवसभर त्या भंगार गोळा करतात. त्यातून त्यांना दिवसाला ६० ते १०० रुपये हातखर्ची सुटते. त्यांना पायाचे आणि कंबरेचे दुखणे आहे. कंपनीकडून १० ते १५ लाख रुपयांची थकबाकी कमल यांना मिळणे अपेक्षित आहे. कंपनीच्या समोर एनआरसी संघर्ष समितीतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे कमल यांचा पंधरा दिवसांचा रोजगार बुडाला आहे.
सोजर कचरू ओव्हाळ यांची कथा काही वेगळी नाही. त्या मूळच्या बीड जिल्ह्यातील लोणीच्या. त्यांचे पती कचरू हे लोणीचे. सोजर या त्यांच्या मामाकडे होत्या. मामांनी कचरूसोबत लग्न लावून दिले. कचरू हे एनआरसीत कामाला होते. बरीच वर्षे अस्थायी काम केल्यावर स्थायी स्वरुपात कायम मिळाल्यावर केवळ सात वर्षानी कंपनी बंद पडली. २०१६ मध्ये कचरू यांचे निधन झाले. कचरू हातगाडीवरून कागदाचा लगदा वाहून न्यायचे. त्यावेळी त्यांच्या पोटात गाडीचा दांडा घुसल्याने त्यांना दुखापत झाली होती. सोजर यांचा मुलगा विकास हा लॉकडाऊनमध्ये कामावर जात असताना पोलीस त्याच्या मागे लागले. त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याचा पाय मोडला. तो घरीच आहे. त्याने पत्नी व मुलांना माहेरी पाठवून दिले आहे. सोजर यांना दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा डावा हात मोडला आहे. त्यात रॉड टाकला आहे. हात मोडल्याने धुणी भांड्याची कामे करता येत नाहीत. दोन वर्षांपासून केवळ एक हजार रुपयांची पेन्शन मिळते. त्यावर कसे काय भागवायचे. कंपनीकडून सोजर यांना २० लाख ७१ हजार रुपये येणे बाकी आहे.
कौशल्या किसन पवळ यांचे पती किसन यांचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. थकीत देणी मिळत नसल्याने किसन यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते मरण पावले. कौशल्या यांना दोन मुले आहेत. त्यांना लॉकडाऊनमुळे काम मिळत नाही. कौशल्या मोहने परिसरात पापड लाटण्याचे काम करतात. त्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे. एक किलो पापड लाटल्यावर १५ आणि दोन किलो पापड लाटल्यावर ३० रुपये मिळतात. गुडघ्याच्या त्रासामुळे जास्त वेळ पापड लाटता येत नाहीत. दोनवेळा खायचे काय याची भ्रांत आहे.
तानाजी वीर हे कंपनी बंद झाल्यापासून भाजी विक्री करीत आहेत. आता दिवसाला शंभर रुपये कसेबसे सुटतात. वीर यांना एक गतिमंद मुलगी आहे. तिच्या उपचाराचा खर्च जास्त आहे. वीर कंपनीच्या कामगार वसाहतीमधील घरात राहतात. त्यांना हुसकावून काढण्याकरिता वीज - पाणीपुरवठा खंडित केला आहे. उकाड्याचे दिवस सुरू झाल्याने त्यांची गतिमंद मुलगी रात्र रात्र झोपत नाही आणि पंखा लावा म्हणून सांगते. तिला काय उत्तर द्यायचे. रात्रीच्या अंधारात त्या भग्नावस्थेतील घरात वीर कंठाशी आलेला हुंदका फक्त दाबतात...
फोटो-
१.कल्याण-कमल डोंगरे
२.कल्याण-सोजर ओव्हाळ
३.कल्याण-कौशल्या पवळ
४.कल्याण-तानाजी वीर
---------------------
वाचली