ठाणे : एखाद्या कलाकृतीतून काही संदेश देताना अनेकदा वेगळ््या प्रतिमा रंगवाव्या लागतात. कधी त्या परस्परविरोधी असतात. जर संभाजी महाराजांच्या प्रतिमेबद्दल इतक्या वर्षांनी अशा पद्धतीने निषेध व्यक्त केला जाणार असेल, तर वेगळी भूमिका मांडणाऱ्या प्रत्येकाचेच पुतळे फोडणार का, असा संतप्त सवाल नाटककारांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आणि राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडण्याच्या संभाजी ब्रिगेडच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. एखादी कलाकृती पसंत नसेल, तर त्याबद्दल निषेध व्यक्त करण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. ते सोडून असा पर्याय निवडण्याची कृती अश्लाघ्य आहे. जर याच पद्धतीने निषेध व्यक्त करायचा असेल, वेगळ््या पद्धतीने प्रतिमा रंगवण्यास विरोध करायचा असेल; तर याच न्यायाने रामायण, महाभारतालाही तो करावा लागेल, असे परखड मत मांडत नाटककारांनी या विषयाचे राजकारण करणाऱ्यांचे कान टोचले आहेत. जातीच्या आधारावर साहित्यकृतींचा विरोध केला जाणार असेल, तर सरकारनेच अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली. या घटनेचा तातडीने निषेध करणाऱ्या नाट्य परिषदेलाही नाटककारांनी चिमटा काढला असून ही तत्परता इतरवेळी का दाखवली जात नाही, असा प्रश्न केला आहे. (प्रतिनिधी) निवडणुका डोळ््यासमोर ठेवून राजकीयदृष्ट्या केलेली कृती संजय पवार : या कृतीचा निषेधच करायला हवा. हा प्रकार राजकीयदृष्ट्या केलेला आहे. याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने घेतली, असे मी ऐकले आहे. ते आता निवडणुका लढविणार आहेत. या घटनेवर कोणताही राजकीय पक्ष आता थेट प्रतिक्रिया देणार नाही. आता निवडणुका आहेत, त्यामुळे ते फक्त गडकरींबद्दल बोलतील. संभाजी महाराजांबद्दल ते काहीही बोलणार नाहीत. कारण राजकारण्यांना मराठा समाजाला दुखवायचे नाही. नाट्यपरिषदेने या घटनेचा निषेध केला आहे. आता हीच नाट्य परिषद नथुराम गोडसेच्या नाटकावर काय भूमिका घेणार? त्यांना मध्येच प्रतिक्रिया देण्याची जाग येते.ज्यांनी हे कृत्य केले, त्यांच्यासोबत वैचारिक चर्चा करण्यास नाट्य परिषद तयार आहे का? नथुराम गोडसेवर नाटक येते. त्याचा अभिमान वाटतो. ते नाटकही चालू दिले जातो. त्या नाटकाकडे कलाकृती म्हणून पाहिले जाते. तसे असेल तर तोही गांधीविरुद्ध निषेधच आहे. नाट्य परिषदेने सोयीची भूमिका घेऊ नये. आजच्या प्रकरणावर नव्हे, तर त्यांनी दरवेळी भूमिका घ्यावी. कारण अशा अनेक घटना घडतच असतात. संभाजी ब्रिगेडला उत्तर द्यायचे असेल तर त्यांनी ते कलाकृतीतून द्यावे.राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडून काय होणार? हा प्रकार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडला आहे. हे नाटक काही आता लिहीलेले नाही. त्यामुळे आता अशा पद्धतीने रिअॅक्ट होणे हे चुकीचे आहे. काही कथा, कादंबऱ्यांमध्ये आजपर्यंत संभाजी महाराजांची प्रतिमा अशाच प्रकारे रंगविली आहे. ती काही एकट्या गडकरींनी रंगविलेली नाही. मग त्यांचेही पुतळे फोडणार का? राजकारणी हे मराठा समाजाचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ब्राह्मण समाजाने चुकीचा इतिहास लिहीला, असे संभाजी ब्रिगेडला वाटत असेल तर त्यांनी योग्य इतिहास लिहावा. मात्र पुतळा फोडणे हे चुकीचेच आहे. आनंद म्हसवेकर : अशाप्रकारे निषेध व्यक्त करणे, हे चुकीचेच आहे. कोणत्याही विचारांचे खंडन करायचे असेल, तर ते वैचारिक पातळीवर करावे. मतभेद असावेत, पण ते अशाप्रकारे व्यक्त होणे अतिशय अयोग्य आहे. प्रेमानंद गज्वी : पुतळा तोडणे हा काही उपाय नाही. एखाद्या जातीवर दुसऱ्या जातीने कुरघोडी करणे हा कॉमन फॅक्टर झाला आहे. सध्या जातीचं राजकारण सुरू आहे त्यामुळे आता जातव्यवस्थाच नष्ट केली पाहिजे. कोणाला कोणत्याही कृतीबद्दल काहीही आक्षेप असेल, तर त्यांनी कोर्टात जावे. कोर्टातून न्याय मिळवावा. तशीच वेळ आली, तर पुस्तकावर बंदी घालावी.आपल्याकडे सनदशीर मार्ग उपलब्ध आहेत. मात्र असे वागणे बरोबर नाही. जातीमध्ये वादंग निर्माण होत असेल, तर त्याचा बंदोबस्त शासनाने करावा. रत्नाकर मतकरी : इतक्या थोर नाटककराच्या कृतीला विरोध करुन त्यांचा पुतळा तोडणे ही अश्लाघ्य कृती आहे. नाटककार लिहीतो तेव्हा त्याची पात्रं ही सर्व प्रकारची असतात. चांगला नाटकककार हा एका पात्राची बाजू घेत नाही. त्या त्या पात्राला जे वाटते ते तो लिहीतो. कोणत्याही साहित्यकृती घेतल्या, तर त्या साहित्यकृतीतील पात्र किंवा विचार हे परस्परविरोधी असणारच. अशा घटनांना विरोध करायचा असेल; तर रामायण, महाभारतापासून सर्वच साहित्यांना करावा लागेल. राम गणेश गडकरी यांचे स्थान रसिकांच्या मनात, मराठी रंगभूमीवर चिरंतन आहे. ते कसे घालविणार? इतक्या थोर नाटककाराने प्रत्येक गोष्ट ही जबाबदारीने केली आहे. त्यांना कितीही विरोध केला तरी मराठी वाङमयावर, मराठी रंगभूमीवर गडकरी यांचे स्थान कायम असेल.
प्रत्येकाचे पुतळे फोडणार का?
By admin | Published: January 04, 2017 4:53 AM