लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मार्च २०२० पासून भारतात कोरोना महामारीमुळे सर्वत्र धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. गेल्यावर्षी श्रावण महिना शिवभक्तांना घरातच बसून पूजाअर्चना करून घालवावा लागला. यंदाही राज्य शासनाची निर्बंध मागे घेण्याची तयारी नसल्याने समस्या कायम असून यंदा तरी देवळात जाऊन देवाचे मनसोक्त दर्शन होणार का? असा सवाल शहरातील विविध देवी-देवतांचे उपासक, भक्त विचारत आहेत.
श्रावण महिना २५ जुलैपासून सुरू होत आहे. २२ ऑगस्टपर्यंत तो असेल. कोरोनामुळे यंदा तरी मंदिरात प्रवेश मिळणार का? असा सवाल भक्त मंदिर प्रशासनाला विचारत आहेत. त्या अनुषंगाने अभिषेक नोंदणी सुरू झाली असून मंदिरे उघडली नाहीत तरीही इच्छित देवतांवर अभिषेक व्हायला हवा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
------------
यंदा श्रावण २९ दिवसांचा असून २६ जुलै, २ ऑगस्ट, ९ ऑगस्ट, १६ ऑगस्ट अशा श्रावणी सोमवारच्या तारखा आहेत.
------------
२५ जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. महिनाभर बहुतांशी मंदिरांमध्ये पूर्जाअर्चना होत असते. या काळात मंदिर परिसरात आर्थिक उलाढाल वाढत असते. याच काळात भक्त विविध संकल्प सोडतात, काही जण दानधर्म करतात, तर काही जण मंदिरात दुधाचा अभिषेक, रुद्र पठण, श्री सुक्ताचे पठण करतात. काही उपास, उपासना करतात. या काळात खजूर, उपवासाचे खाद्यपदार्थ, फळे, वस्त्र, हार, फुले आदींना खूप मागणी असते. यंदाही त्याचा व्यवसाय करणारे व्यावसायिक निर्बंध शिथिल होतील, या आशेवर आहेत.
----------
डोंबिवलीत अनेक भक्त श्रावणात विशिष्ट संकल्प करतात, त्या भक्तांना यंदा देवळात येऊन इच्छित देवतेसमोर संकल्प सांगायचा आहे, अभिषेक पूजा करण्याची इच्छा आहे. मात्र, अद्यापही राज्य शासनाने मंदिरांबाबत निर्णय घेतलेला नाही. तो निर्णय झाला, तर भक्तांच्या आनंदाला पारावार राहणार नाही. मंदिरांची तसेच त्याअनुषंगाने अन्य व्यावसायिकांची आर्थिक विस्कटलेली घडी बसण्यास साहाय्य होईल. दीड वर्षात व्यक्तिगत आणि सामाजिक नुकसान खूप झाले आहे. आता श्रावणावरच व्यावसायिकांचे बरेच काही गणित अवलंबून आहे.
- ओमकार परूळकर, गुरुजी
-----------
गुरुपौर्णिमा तोंडावर आली असून राज्यात निर्बंध कायम आहेत, म्हणजे त्यानिमित्ताने होणारा व्यवसाय होणार नाही हे स्पष्ट आहे. श्रावणात तरी ती संधी मिळावी आणि हार, फुलांना मागणी मिळावी. गुढीपाडव्याचे दोन सण पाण्यात गेले. कुटुंबाची होणारी आर्थिक घुसमट सहन होत नाही. मंदिरे उघडायला हवीत. व्यवसायाला तेजी मिळावी.
- हार, फुले विक्रेता.
---------