लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून १५०० रुपयांची लाच देऊन तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न मिंधे सरकारकडून केला जात आहे. केवळ १५०० रुपयांसाठी तुम्ही महाराष्ट्र विकायला देणार आहात का, असा सवाल उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला. महिलांनी आता ‘आम्हाला लाच नको तर रोजगार द्या’, अशी मागणी केली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उद्धवसेनेच्या वतीने ‘भगवा सप्ताहा’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले की, आता शिक्षण, पुस्तके यांच्यासह आरोग्य विम्यावर जीएसटी लावला आहे. म्हणजेच ‘जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी जीएसटी भरा’. राज्य सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. तीन महिने थांबा मग तुमचे सरकारी मिंधे यांच्या कलेक्टरांना कुठे पाठवतो ते बघाच, असा इशाराही त्यांनी दिला.
ठाण्याने आजवर शिवसेनेवर प्रेम केले, याच प्रेमापोटी शिवसेना ठाण्यात टिकून आहे. ठाणेकरांनी मेहनत घेतली नसती तर मिंधेची दाढी सुद्धा उगवली नसती, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. आधी १५ लाख देणार होते, आता मात्र १५०० वर बोळवण करण्याचे काम झाले असून वरचे शून्य कोणाच्या खिशात गेले, असा सवाल ठाकरे यांनी केला. ठाण्यात क्लस्टर योजनेची कामे आपल्या मर्जीतील ठेकेदारांनाच दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी शिंदे सरकारवर केला. त्यांच्या या कृत्यामुळेच ठाणे महापालिकेला कर्जाचे डोहाळे लागले, अशी टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्राचे मंत्रालय मुंबई की अहमदाबादला हवे, असा सवाल उपस्थित करीत आताची लढाई ही शिवसेना विरुद्ध मिंधे नसून महाराष्ट्र द्वेष्ट्यांविरुद्ध असल्याचेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत मशाल पेटवायची आहे, लोकशाहीची हत्या करणाऱ्यांचे बूड जाळायचे आहे, असे ठाकरे म्हणाले. काल नागपंचमी झाली, यादिवशी नागाला दूध पाजतात. उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील सापाला दूध पाजले. लोकसभेत शेपट्या वळवळल्या. पण, विधानसभेत आम्ही त्यांचे फणे ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
‘आणि म्हणून...’ची उडवली खिल्ली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषण करताना ‘...आणि म्हणून’ या शब्दांचा वारंवार उल्लेख करतात असा उल्लेख करून उद्धव ठाकरे यांनी बोलायचे तर सरळ बोला, बोलताना यांना पोट साफ करायचे औषध देण्याची वेळ आल्याची टीका केली.