भिवंडी : शहरातील चरनीपाडा भागात राहणाऱ्या विवाहित महिलेस लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करणाऱया व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रारीसाठी निघालेल्या पीडितेस लॉजमध्ये डांबून तिच्यावर जादूटोणा करण्याचा प्रकार काही आरोपींनी केला. तिच्यावर वशीकरणाचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील अंजूरफाटा-चरनीपाडा येथील मनोज गोहील याने शेजारील वस्तीत राहणाऱ्या २९ वर्षांच्या विवाहितेशी तीन महिन्यांपासून प्रेमसंबंध जोडून तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्या राहत्या घरी आणि विविध लॉजमध्ये नेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. मात्र, पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता मनोजने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने पीडित महिला पोलिसांकडे तक्रार देण्यास निघाली. त्यावेळी तिला मनोजच्या नातेवाइकांनी रस्त्यात अडवून काल्हेर येथे एका लॉजमध्ये नेऊन डांबले. तेथे एका तांत्रिक बाबाच्या मदतीने जादूटोणा, होमहवन, पूजापाठ करून महिलेचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. तिला शिवीगाळ तसेच मारहाण करून आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली.
या लॉजमधून युवतीने कशीबशी सुटका करून घेत नारपोली पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मनोज गोहील याच्यासह त्याचे नातेवाईक आणि तांत्रिक बाबा यांविरोधात गुन्हा दाखल केला. अद्याप कोणाला अटक झालेली नाही.