ठाणे : ठाणे शहरात आधीच मुंबई महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यात आता ठाणेकरांना पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे शहराला आजच्या घडीला ५८५ दशलक्ष पाणी पुरवठा होत आहे. यात महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून २५० दशलक्ष, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ एमएलडी, स्टेम ११५ एमएलडी आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु मागील महिन्यापासून मुंबई महापालिकेकडून होणाºया पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. ती अद्यापही बंद करण्यात आलेली नाही. त्यात आता पुन्हा ठाणेकरांवर पाणी संकट कोसळले आहे. मागील काही दिवसापासून पावसाची रिपरिप सुरु होती. परंतु मागील दोन ते तीन दिवसापासून ठाण्यासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
धरण क्षेत्रातही पाऊस चांगला बरसला आहे. परंतु या दमदार पावसामुळे ठाणे शहराला होणाºया पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्याने महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस (०९, १० आणि ११ जुलै, २०२४) अपुºया प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परंतु हे काम होईपर्यंत ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. सोमवारी सकाळीच अनेक भागात पाणी पुरवठा बंद होता, घोडबंदरमध्ये काही भागांचा पाणी पुरवठा कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणी पुरवठा कमी कालावधीसाठीच सुरु असल्याचे चित्र दिसून आले. त्यातही पुढील तीन दिवस ५० टक्के पाणी कपात असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.