ठाणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्यात भूकंप केला असतांनाच त्याचे पडसाद आता ठाण्यातही उमटले आहेत. राष्ट्रवादीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनी अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी निवासस्थानी हजेरी लावली आहे. तसेच अजित पवार यांच्या निकटचे समजले जाणारे ठाण्यातील माजी नगरसेवक देखील आता नॉट रीचेबल झाल्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का समजला जात आहे.
अजित पवार यांनी शिंदे फडणवीस युती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आता ठाणे शहरातही त्यांच्या निकटचे समजले जाणारे काही माजी नगरसेवकही नॉट रिचेबल झाले आहेत. यात नजीब मुल्ला यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यात मागील काही वर्षे शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये आलेले आनंद परांजपे यांनीही रविवारी दुपारनंतर अजित पवार यांना समर्थन देत देवगिरी वर हजेरी लावली. परांजपे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या ५ नगरसेवकानी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरू होती. त्यात रविवारी राज्यात झालेल्या या राजकीय भूकंपानंतर ठाण्यातही राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकांनी आव्हाड यांची साथ सोडत अजित पवारांना टाळी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीचा देखील ठाण्यात आता सुपडा साफ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.आव्हाडांना विरोधी पक्षनेते पद म्हणजे उतावळा नवरा गुढघ्याला बाशिंग असल्याची शिवसेनेची टीका... जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाने खिल्ली उडवली आहे. जितेंद्र आव्हाडांना बहुतेक खूप घाई झाली आहे. ते वाटच बघत होते अजितदादा कधी जातात याची. म्हणूनच स्वतःच सांगत सुटले आहेत विरोधी पक्षनेतेपदाबाबत..मात्र विरोधी पक्षनेते पदाची निवड ही विधानसभा अध्यक्ष यांचा अधिकार आहे. पत्रकार परिषदेत खुद्द शरद पवार यांनीही हेच वक्तव्य केले. त्यामुळे आव्हाड म्हणजे उतावळा नवरा गुढघ्याला बाशिंग, अशी स्थिती झाल्याचा टोला शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लागवला आहे.
संजय राऊत यांनी शरद पवारांचा क्लिनबोल्ड केल्याची शिंदे गटाची टीका
संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा क्लीन बोल्ड झाला आहे. मात्र, त्यांनी शरद पावरांचाही क्लीन बोल्ड केला असून करावे तसे भरावे, ही म्हण पवारांना तंतोतंत लागू राहण्याचा टोला शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लागवला आहे. संजय राऊत यांच्या मदतीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाची जी दशा केली त्याच फळ पवारांना मिळालं नियतीने दिलेलं हे बक्षीस असून तुमचा पक्ष संपला आहे आणि याला कारणीभूत संजय राऊत ठरल्याची घणाघाती टीका म्हस्के यांनी केली.