- धीरज परब
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने केवळ २० ठिकाणी फटाके स्टॉल ना परवानगी दिल्याची यादी जाहीर केली असताना दुसरीकडे शहरात सर्वत्र बेकायदा फटाका स्टॉलचा सुळसुळाट झाला आहे . महापालिकेच्या आशीर्वादाने बेधडकपणे फटाका विक्री स्टॉल सुरु असून उच्च न्यायालयाने दिलेले आदेश व कायदे - नियम पायदळी तुडवले जात असताना पोलिसांनी सुद्धा बघ्याची भूमिका घेतली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा नंतर शासनाने देखील फटाके विक्रीचे परवाने मोकळ्या जागेत वा पटांगणात देण्याचे निर्देश दिले आहेत . इतकेच नव्हे तर शासनाने सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी तसेच निवासी इमारती मध्ये फटाके विक्रीस परवाने देऊन नये . बेकायदा फटाके विक्री वा साठवणूक वर तात्काळ कारवाई करावी असे स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारची अधिसूचना सुद्धा फटाक्यांच्या विक्रीसाठी जिल्हा दंडाधिकारी यांच्या कडून परवानगी हवी असे सांगते . स्टोल बंदिस्त हवा व दोन स्टॉल मध्ये किमान ३ मीटर अंतर हवे असे केंद्राच्या अधिसूचनेत स्पष्ट आहे . शिवाय फटाके हे अतिशय स्फोटक असल्याने भारतीय विस्फोटक कायदा १८८४ नुसार नागरीकांच्या जिवीत आणि मालमत्तेच्या सुरक्षेची काळजी घेणे महापालिका व पोलीसांना बंधनकारक आहे.
परंतु महापालिकेने फटाके विक्रीची परवानगी दिलेल्या २० पैकी बहुतांश ठिकाणी न्यायालय , केंद्र व राज्य शासन तसेच कायदे गुंडाळून ठेवल्याचे स्पष्ट आहे.
त्यात कहर म्हणजे पालिकेने दिलेल्या २० ठिकाणा व्यतिरिक्त शहरात गल्लीबोळा पासून मुख्य रस्ते , मुख्य नाके , सार्वजनिक ठिकाणी अगदी ज्वलनशील गॅस आदी वापरणाऱ्या हातगाड्यांच्या लगत मोठ्या संख्येने बेकायदा फटाके विक्री करणारे स्टॉल लागलेले आहेत.
बेकायदा स्टॉल उघडपणे सर्वत्र लागलेले असताना देखील महापालिकेचा फेरीवाला पथक , प्रभाग अधिकारी पासून अतिक्रमण विभाग प्रमुख व उपायुक्त व अग्निशमन दलाने संरक्षण दिलेले असल्यानेच त्यावर कारवाई केली जात नसल्याचे दिसत आहे . मध्यरात्री पर्यंत हे बेकायदा फटाके विक्री स्टॉल सुरू असतात. ह्या बेकायदा फटाका विक्री स्टॉल ना पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी नाहरकत दिली कि नाही ? हे सुद्धा गुलदस्त्यात असून पोलीस सुद्धा ह्या गंभीर बाबीं कड़े कानाडोळा करत आहेत . फटाके विक्रेत्यांचा प्रचंड आर्थिक फायदा करून देण्यासाठी पालिका आणि पोलिसांनी लोकांच्या जीवाशी खेळ चालवल्याचा आरोप जागरूक नागरिक करत आहेत . हा मोठा भ्रष्टाचार असून यात पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी लोक करत आहेत.
- प्रकाश बोराडे ( प्रभारी अग्निशमन दल प्रमुख ) - अग्निशमन दलाने परवानगी दिलेल्या फटाके विक्रीच्या २० ठिकाणांची यादी सुरवातीलाच प्रभाग कार्यालयांना दिली आहे . बेकायदा स्टॉल वर त्यांच्या मार्फत कारवाई केली जाते व गुन्हे दाखल केले जातात .