पंकज पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर: कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे आणि बाळाराम पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेले दोन डमी उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले होते. मात्र, मतांचे विभाजन होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांनी सामंजस्याचे दर्शन घडवत डमी उमेदवारांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता मूळ म्हात्रे व पाटील यांच्यातच लढत होईल.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात १३ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते, त्यापैकी पाच उमेदवारांचे अर्ज सोमवारी मागे घेण्यात आले. या पाच उमेदवारांमध्ये बाळाराम पाटील आणि ज्ञानेश्वर म्हात्रे या दोन उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, हे पाटील आणि म्हात्रे नेमके कोणते, असा पेच सर्वांनाच पडला होता. विद्यमान आमदार बाळाराम पाटील महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवीत आहेत, तर शिवसेना-भाजप युतीतर्फे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक रिंगणात आहेत. पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक होत नसल्यामुळे उमेदवाराचे नाव हेच निवडणुकीत प्रभावी ठरते. त्यामुळे आघाडी आणि युती या दोन्ही गटांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार रिंगणात उतरविले होते.
बळीराम परशुराम म्हात्रे आणि ज्ञानेश्वर पुंडलिक म्हात्रे अशा दोन उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते. दिग्गज उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने मतांचे विभाजन होण्याची भीती निर्माण झाली होती. दोन्ही दिग्गज उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्याला शह देण्याचा हा अनोखा मार्ग अवलंबला होता. मात्र, आपली खेळी आपल्याच अंगलट येऊ नये यासाठी दोन्ही पक्षांनी सामंजस्य दाखवत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी डमी उमेदवारांचे अर्ज मागे घेतले.
डमी उमेदवार नेमके कुठले?
- युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासारख्या नावाचे उमेदवार ज्ञानेश्वर पुंडलिक म्हात्रे हे मूळचे नावडे येथील वळवली गावचे रहिवासी आहेत. ते खासगी नोकरी करतात.
- महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्यासारख्या नावाचे उमेदवार बाळाराम गणपत पाटील हे मूळचे शिळफाटाजवळील पडले गावातील रहिवासी आहेत. त्याचा बांधकाम साहित्य पुरवठ्याचा व्यवसाय आहे.