डोंबिवली: सोमवारी रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, त्यामुळे मध्य रेल्वे पाण्याखाली गेल्याने ठाण्यापुढे सीएसएमटीपर्यंत वाहतूक पहाटेपासूनच ठप्प झाली होती. महाराष्ट्र शासनाने हवामान खात्याच्या मार्गदर्शनानूसार जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे सोमवारी जसे चाकरमानी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अडकून पडले होते तसा प्रकार अन्यत्र कुठेही घडू नये, प्रवासी अडकून त्यांचे हाल होऊ नयेत यासाठी शासकीय सुटी जाहिर केली होती. परंतू ठाणे जिल्ह्यात मात्र सकाळी साडेआठ नंतर संध्याकाळी ४वाजेपर्यंत फारसा पाऊस झालाच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो चाकरमान्यांनी शासकीय सुटीचा आनंद लुटला. मुंबईत पावसामुळे लोकल बंद होती, परंतू ठाण्यापर्यंत मात्र अर्धा ते पाऊण तासांच्या विलंबाने लोकलसेवा मंगळवारीही सुरु होती, परंतू सुटी असल्याने चाकरमान्यांची वर्दळ तुललेने कमीच होती.सोमवारच्या दिवसाचा खाडा झाल्यानंतर आणि लोकलमध्ये अडकून हाल झाल्याने प्रवाशांमध्ये मध्य रेल्वे प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाली. त्या नाराजीमुळे मंगळवारी सुटी जाहिर केल्यानंतर रात्री उशिराने घरी पोहोचलेल्या प्रवाशांनी स्थानकाकडे पाठ फिरवल्याने सकाळच्या वेळेत डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली आदी स्थानकांमध्ये तसचे कसारा, कर्जत मार्गावरील स्थानकांमध्ये फारशी गर्दी झाली नव्हती. कल्याण रेल्वे स्थानकात लांबपल्याच्या प्रवासासाठी जाणा-या प्रवाशांची गर्दी होती, परंतू लांबपल्याच्याही गाड्या ठिकठिकाणी अडकून पडल्याने त्या प्रवाशांचे स्थानकातच हाल झाले. अनेक प्रवाशांनी लोकलमध्येच रात्र झोपून काढली. आसनावर, खाली, प्रवेशद्वाराच्या पॅसेजमध्ये जिथे जागा मिळेल तिथे प्रवाशांनी पथारी टाकत भुकेल्या पोटी झोपण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळेत सायन ते घाटकोपर आणि त्यापुढे डाऊन मार्गावर ठाण्यापर्यंत लोकल येण्यासाठी तासन्तास लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सगळीकडे पाणीच पाणी साचल्याने नेमके काय करावे असा प्रश्न प्रवाशांना पडला होता. अखेरीस प्रवाशांनी जागा मिळेल तिथे पथारी मांडत विसावा घेण्याचा प्रयत्न केला. त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर मात्र पावसाने दिली शासनाला हुलकावणी अशी सर्वत्र चर्चा सुरु होती.* डोंबिवली ते कल्याण आणि बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा आदी रेल्वे स्थानकांमध्ये तुरळक प्रवासी आणि लोकल नसल्याने स्वच्छतेवर अधिक भर देण्यात आला होता. स्थानकांमधील फलाट, रुळांमंधील गटार यांसह स्वच्छतागृहे अशा सर्व ठिकाणी जेथे पाणी जमा होते त्या ठिकाणी घाण काढण्यात आली. पत्र्यांवरून फलाटांत जिथे गळती लागलेली आहे त्याची पाहणी करण्यात आली.कल्याण ठाणे प्रवासासाठी ताससकाळच्या वेळेत कल्याण ठाणे लोकल सेवा सुरु होती. कल्याणहून ठाण्याला जाण्यासाठी प्रवाशांना एरव्ही जलद गाडीने १८ तर धीम्या गाडीने २१ मिनिटे लागतात, परंतू मंगळवारी मात्र लोकलचे वेळापत्रक सपशेल कोलमडल्याने या प्रवासासाठी तब्बल तासभराचा अवधी लागत होता. कल्याण ते डोंबिवली लोकल वेळेत येत होती, मात्र त्यानंतर दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकात जाण्यासाठी मात्र लोकलची रखडपट्टी सुरु होती. ठाण्यात कळवा खाडीपूलावर गाड्या रेंगाळल्या होत्या. त्यानंतर ठाणे स्थानकातून परत कल्याण दिशेकडे येण्यासाठीही लोकल प्रवासाला पाऊण तास लागत होता. सकाळी साडेअकरानंतर लोकलचा वेग काहीसा वाढला, पण तरीही संंध्याकाळपर्यंत त्या मार्गावरील लोकल सेवा पंचवीस मिनिटे विलंबानेच सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश पवार यांनी दिली.
पावसाच्या धसक्याने राज्य शासनाची चाकरमान्यांना सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 6:01 PM