लोकमत न्यूजठाणे: किरकोळ कारणावरुन ठार मारण्याची धमकी देणा-या बळीराम प्रजापती उर्फ बल्ली (५५) याचा हत्याराने वार करुन खून करणा-या फरमान खान (२०, रा. जिगनी, जि. फत्तेपूर, उत्तरप्रदेश) याला खांडवा रेल्वे पोलिसांच्या मदतीने अवघ्या काही तासांमध्येच जेरबंद केल्याची माहिती कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनी दिली. खान याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्याच्या मुंब्रा पनवेल रोडवरील गोठेघर महादेव इंडस्ट्रिअल येथे फरमान आणि बळीराम हे दोघेही लाकडी पेटया बनविण्याचे .काम करीत होते. बळीराम याच्या ओळखीतूनच महादेव इंडस्ट्रिअल येथे फरसानला काम मिळाले होते. यातूनच त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. आपल्यामुळेच फरमानला काम मिळाल्यामुळे बळीराम त्याच्याकडून भांडा धुण्यापासून अनेक छोटी मोठी कामे करुन घेत होता. त्यातच बळीराम कामावर देखिल दारु पिऊन आल्याचे फरमानने मालकाला सांगितले होते. या बाबीवरुन मालकाने खडसावल्यामुळे बळीरामने फरमानला बघून घेण्याची धमकी दिली होती. कामावर मी किंवा तू राहील, असेही त्याने बजावले होते. आता बळीराम आपल्याला ठार मारेल, अशी भीती असलेल्या फरमानने त्याचाच काटा काढण्याचे ठरविले. यातूनच त्याने २३ नोव्हेंबर रोजी रात्री डोक्यात वार करुन त्याचा खून केला. या खूनाचा कोणताही धागादोरा नसतांना डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने बळीरामसोबत काम करणाºया फरमान हा घटनास्थळावरुन पसार झाल्याची माहिती काढली. त्याचा मोबाईलही बंद आढळला. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, उपायुक्त डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वेगवेगळया पथकांनी ३० तासांच्या घडामोडींची सीसीटीव्हींची पडताळणी केली. उत्तरप्रदेश येथील गावी जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात पहाटे ४ वा. च्या सुमारास गेल्याची तसेच कानपूर येथे जाणारी पुष्पक एक्सप्रेस सकाळी ९.३० वा. कल्याणमधून पकडल्याची माहिती मिळाली. ती मिळाल्यानंतर त्याचा फोटो आणि माहिती डायघर पोलिसांनी भुसावळ रेल्वे सुरक्षा नियंत्रण कक्ष तसेच खांडवा (मध्यप्रदेश) रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाकडे व्हॉटसअॅपद्वारे पाठविली. ती मिळताच सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी त्याला खांडवा स्थानकातच ताब्यात घेतले. त्यानंतर डायघर पोलिसांनी त्याला २५ नोव्हेंबर रोजी अटक केल्यानंतर त्याने या खुनाची कबूली दिली.
खूनाच्या गुन्हयाचा अवघ्या आठ तासांमध्ये छडा: पळालेल्या खून्याला रेल्वेतून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 9:30 PM
क्षुल्लक कारणावरुन आपल्याच साथीदाराचा खून करणाऱ्या फरमान खान याला डायघर (ठाणे) पोलिसांनी खांडवा (मध्यप्रदेश) पोलिसांच्या मदतीने अवघ्या काही तासांमध्ये अटक केली. विशेष म्हणजे कोणताही धागादोरा नसतांना अतिशय कौशल्याने पोलिसांनी खूनाचा हा गुन्हा उघड केला.
ठळक मुद्देखांडवा पोलिसांच्या मदतीने केले जेरबंदसीसीटीव्हीतून मिळाला धुवाव्हॉटसअॅपमुळेही तपासाला गती