कल्याण : सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे नेहमीच बोलले जाते; परंतु ही जाणीव दिव्यांगांच्या बाबतीत सहसा दिसून येत नाही. ती निर्माण होणे गरजेचे आहे. देशातील असमानता नष्ट होत नाही, तोपर्यंत आपला देश महासत्ता होऊ शकत नाही, असे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्कारविजेते, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी रविवारी येथील कार्यक्रमात केले.
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिव्यांगबांधवांना कृत्रिम अवयव, ट्रायसिक ल, व्हीलचेअर, स्मार्टफोन, ब्रेल किट आदी मदत साहित्याचे वाटप करण्याच्या अनुषंगाने पूर्वेकडील तिसगावमधील तिसाईदेवी मंदिर मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. आमटे यांनी या उपक्रमाबद्दल श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. दिव्यांगांना मदत करणे, हे सुदृढ नागरिकाचे कर्तव्य आहे. आम्ही गेली ४५ वर्षे त्यांची सेवा करत आहोत. दुसऱ्याला सेवा देण्यात जो आनंद मिळतो, तो आम्ही भरभरून अनुभवला. बाबा नेहमी म्हणायचे, दिव्यांगांना संधी द्या. त्यांना मदत लागतेच. त्यावाचून पुढे जाता येत नाही. परंतु, मनात इच्छाशक्ती लागते. त्याने सर्व साध्य होऊ शकते. नुसत्या तक्रारी केल्या, तर काही होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही वाटेल ते करू शकता, हे या उपक्रमातून दिसून येते. सरकारने पाच टक्के निधी दिव्यांगांच्या योजनांसाठी राखीव ठेवला आहे. परंतु, या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करायला पाहिजे, याचे मूर्तिमंत उदाहरण डॉ. शिंदे यांनी दाखवून दिले, असे आमटे म्हणाले. दिव्यांगांची प्रदीर्घ काळ सेवा करताना आमच्या कामाचे जे उदाहरण नागरिकांसमोर उभे राहिले, ती नि:स्वार्थी सेवा आपणही करावी, असे तरुणतरुणींना वाटायला लागले आहे. पूर्वीच्या काळी डॉक्टरला परमेश्वर समजले जायचे; परंतु आजघडीला डॉक्टर हे लुटतात, अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनीसुद्धा आपले जीवन व्यतीत करताना गरिबांची सेवा करावी. यातून जे समाधान मिळते, ते दीर्घकाळ टिकणारे आहे. बदनाम झालेली प्रतिमा अशा सेवाभावी उपक्रमांमधून बदलायला मदत होईल. असे बरेच डॉक्टर सेवाभावी वृत्तीने कार्य करत आहेत, असे आमटे म्हणाले. या कार्यक्रमात खासदार शिंदे यांच्या वतीने लोकबिरादरी प्रकल्पाकरिता विशेष देणगी देण्यात आली. सहयोग सामाजिक संस्थेनेही ११ हजार रुपयांचा धनादेश आमटेंना सुपूर्द केला.विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थितीठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आमदार डॉ. बालाजी किणीकर, सुभाष भोईर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, ठाणे महापालिका महापौर मीनाक्षी शिंदे, कल्याण-डोंबिवली महापौर विनीता राणे, अंबरनाथच्या नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी, कल्याणचे महानगरप्रमुख विजय साळवी, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.समाधानाचा दिवस :दिव्यांगबांधवांसाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. वार्षिक अर्थसंकल्पाच्या पाच टक्के रक्कम दिव्यांग कल्याणासाठी खर्च करण्याचे बंधन स्थानिक स्वराज्य संस्थांना आहे. मात्र, या योजना दिव्यांगबांधवांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या वर्षी मेळावे घेऊन लाभार्थ्यांची यादी निश्चित केली आणि सरकारकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला. वर्षभराच्या प्रयत्नांना फळ मिळाल्यामुळे आज समाधानाचा दिवस आहे, असे खासदार शिंदे म्हणाले. शुश्रूषा अपंग साहाय्य सेवा संघ, अपंगालय, धर्मवीर दिव्यांग सेना, अपंग सेवा संघ, आमराई, रु ग्णमित्र भरत खरे, शरद पवार, निंबाजी वाघ, नूरजहाँ खान आदींचे सहकार्य या उपक्र माला लाभले. त्यांचेही शिंदे यांनी यावेळी आभार मानले.समाजाने पुढाकार घेणे गरजेचेच्पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या वर्षभर दिव्यांग व्यक्तींना योजनांचा लाभ मिळावा, यासाठी श्रीकांत यांनी तळमळीने पाठपुरावा केला.च्कृत्रिम पाय असूनही माउंट एव्हरेस्ट चढणारे विनोद रावत यांची प्रेरणादायी कहाणी आपण त्यांच्याच तोंडून ऐकली.च्दिव्यांगांना खरोखर संधीची गरज असते. त्यामुळे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला आपल्या पायावर उभे राहण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे शिंदे म्हणाले.