लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उच्चशिक्षित मुलाच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्याऐवजी पोलिसांनी तपास न करताच आपली तक्रार निकाली काढल्याचा आरोप या मुलाच्या वृद्ध पित्याने केला आहे. ठाण्यातील बाळकुम परिसरातील रिजन्सी सोसायटीचे रहिवासी विनायक लोंढे यांचा १५ एप्रिल रोजी रात्री उशिरा गूढ मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये कापूरबावडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी विनायकच्या वडिलांनी त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. घटनेच्या दिवशी विनायकचे पत्नीसोबत जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. विनायकच्या मृत्यूचा तपास त्या अंगाने करण्याची मागणी त्याचे ७२ वर्षीय वडिल, विक्रोळी येथील रहिवासी सुग्रीव लोंढे यांनी पोलिसांकडे केली. कापूरबावडी पोलिसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत वारंवार निवेदने देऊनही उपयोग न झाल्याने लोंढे यांनी आपले सरकार या शासनाच्या वेबसाईटवर २८ जून रोजी कैफियत मांडली. त्यानुसार कापूरबावडी पोलिसांनी १ जुलै रोजी लोंढे यांना समजपत्र पाठवून त्यांचा तक्रार अर्ज निकाली काढल्याची माहिती दिली. विनायक लोंढे यांचा खून झाल्याबाबत किंवा त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचे पोलिसांनी या समजपत्रात स्पष्ट केले आहे.दरम्यान, यासंदर्भात कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.टी. बारावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोपांचे खंडण केले. मालमत्तेच्या वादातून हे आरोप केले जात असल्याचे बारावकर यांनी स्पष्ट केले.कारवाईची मागणी पोलिसांनी दिलेल्या समजपत्रास लोंढे यांनी प्रत्युत्तर देताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानुसार विनायकने आत्महत्या करण्याचे कारण काय?, घटनेच्या पंचनाम्यात पोलिसांना काय मिळाले?, त्यांचा मृत्यू घरी झाला कि हॉस्पिटलमध्ये?, या प्रकरणात पोलिसांनी कुणा-कुणाचे जबाब नोंदविले? अशा काही प्रश्नांवर पोलिसांना उत्तर मागितले आहे. या प्रकरणाच्या तपासाकडे पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत असून, विनायकच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी लोंढे यांनी केली आहे.
तपासाशिवायच तक्रार काढली निकाली
By admin | Published: July 05, 2017 4:36 AM