- अनिकेत घमंडीडोंबिवली : उल्हासनगरमार्गे कल्याण-मुरबाड या २८ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षणच झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात कल्याण-मुरबाड व्हाया टिटवाळा रेल्वेमार्ग प्रस्तावित होता. नव्या मार्गासाठी या प्रस्तावित मार्गाला रातोरात बगल देण्यात आली आहे. नव्या रेल्वेमार्गाचा निर्णय बिल्डरधार्जिणा असल्याचीही चर्चा यानिमित्ताने सुरू आहे.रेल्वे प्रशासनाच्या वाहतूक विभागाने २०१६-१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार कल्याण-मुरबाड व्हाया टिटवाळा या २३.१२७ किमीच्या प्रवासामध्ये कल्याणनंतर टिटवाळा, घोटसई, पोटगाव, किशोर आणि मुरबाड ही रेल्वेस्थानके येत होती. त्यानुसार, सर्वेक्षणाचा नकाशाही माहितीसाठी पुढे आला होता. रेल्वे प्रशासनाच्या सांकेतिक भाषेतील ‘ब्लू बुक’मध्ये त्याची नोंदही केलेली होती. त्यामुळे कल्याण-अहमदनगर मार्ग झाला नाही, तरीही कल्याण-मुरबाड व्हाया टिटवाळा मार्ग होणार असल्याने टिटवाळा, गुरवली, म्हसकळ, मामणोली, रुंदे, आडिवली आदी दाट वस्तीच्या नागरिकांना दिलासा मिळाला होता; पण रेल्वेच्या अभ्यासानुसार या मार्गावरून रेल्वे गेल्यास प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळणार नाही. फुकटे प्रवासी वाढतील, अशी तांत्रिक कारणेही समोर आली. त्यामुळे तो मार्ग फारसा अनुकूल नसल्याचे सांगण्यात येत होते. तसेच उल्हासनगर येथील नव्या मार्गावरून लोकल धावणार असल्याचे जाहीर केल्यास आगामी निवडणुकांत तेथील मतदारांना पुन्हा युतीकडे आकर्षित करणे शक्य होणार आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनामार्फत नव्या मार्गाची मागणी करण्यात आली होती. केंद्रीय रेल्वे मंत्रालयानेही त्यास तातडीने मंजुरी दिली. त्यादृष्टीने रातोरात कल्याण-मुरबाड व्हाया उल्हासनगर या नव्या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याचे भूमिपूजन रविवारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.उल्हासनगर येथून हा मार्ग जाणार असल्याने कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर या रेल्वेस्थानकांचा खर्च वाचणार असून रेल्वेचे अतिरिक्त जाळेही उभारावे लागणार नाही. त्यामुळे प्रशासनाला या २८ किमीमध्ये केवळ कांबा रोड, आपटी, पाटगाव आणि मुरबाड या चार स्थानकांची निर्मिती करावी लागणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. रेल्वेने प्रसारित केलेल्या दृक्श्राव्य व्हिडीओच्या माध्यमातून नव्या मार्गासाठी गुगल सर्व्हेची मदत घेतल्याचेही स्पष्ट होत आहे. जुन्या मार्गापेक्षा या नव्या मार्गावरून रेल्वे जात असल्याने पाच किमीचा मार्ग वाढत असून कल्याणहून मुरबाडला जाईपर्यंत सुमारे अर्धा तास ते ४० मिनिटे लागणार आहेत. तेथून कल्याणच्या दिशेने येण्यासाठीही तेवढाच वेळ लागण्याची शक्यता आहे. ७२६.४५ कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च होणार असून २०२३ पर्यंत तो पूर्ण होण्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकल्पाचा लाभ मुरबाड एमआयडीसीला होणार असून तेथील कर्मचाऱ्यांची गैरसोय कमी होईल. त्यामुळे तेथील उत्पादनाला थेट उल्हासनगरची बाजारपेठ उपलब्ध होईल. त्यामुळे रोजगारनिर्मितीला, नव्या गृहसंकुलांना भविष्यात वाव मिळेल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले. नव्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण फार पूर्वी झाल्याचे ऐकिवात असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली; तर यासाठी आता सर्वेक्षण होणार असल्याचे रेल्वेविषयक जाणकारांनी सांगितले. त्यामुळे नेमके सर्वेक्षण झाले की नाही, हे गुलदस्त्यातच आहे.>केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी निवडणुकीआधी केलेला हा स्टंट आहे. त्या रेल्वेमार्गामध्ये कल्याण ते उल्हासनगरदरम्यान अनेक अडचणी असून त्यासाठी बांधकामे तोडणार का?पाच वर्षांत येथील खासदारांना भिवंडी-सीएसटी व्हाया दिवा, हा तयार असलेला रेल्वेमार्ग सुरू करता आला नाही.ते त्यांचे सपशेल अपयश आहे.- सुरेश टावरे,माजी खासदार, भिवंडी>रेल्वेने त्यांच्या सर्वेक्षणानुसार कल्याण-मुरबाड व्हाया उल्हासनगर असा मार्ग ठरवला आहे. यामुळे कांबा, आपटी, पाटगाव आणि मुरबाड ही स्थानके शहरी भागाला जोडली जाणार आहेत. त्यामुळेही एका दृष्टीने ग्रामीण पट्ट्याचा आमूलाग्र विकास होणार आहे.-खा. कपिल पाटील, भिवंडी>रेल्वेमार्ग व्हाया टिटवाळा झाला असता हजारो नागरिकांची गैरसोय दूर झाली असती. १९६६ पासून माजी खासदार सोनूभाऊ बसवंत यांनी केलेली गुरवली स्थानकाची मागणीही यानिमित्ताने पूर्ण झाली असती.- नंदकुमार देशमुख,मूळ रहिवासी, गुरवली>कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणे निश्चितच आहे. पण, हा मार्ग व्हाया उल्हासनगर येणार असल्याने टिटवाळा परिसरातील शेतकऱ्यांना फारसा लाभ होणार नाही. तरीही, रेल्वेमार्ग सुरू होणार असल्याचे आम्हाला समाधान आहे.- जितेंद्र विशे, अध्यक्ष,कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन
कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचा नवा प्रस्ताव सर्वेक्षणाविनाच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 11:43 PM