ठाणे : हिंदी चित्रपटातील एखाद्या प्रसंगाला साजेशी घटना शुक्रवारी ठाणे न्यायालयात घडली. चौघांच्या मारहाणीत दोन्ही पाय मोडलेल्या भिवंडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाने आरोपींविरुद्ध साक्ष नोंदवण्यासाठी चक्क स्ट्रेचरवर हजेरी लावली.भिवंडी येथील खंडुपाड्यातील आखरी चाळीत राहणारे मोहम्मद शाहीद मुकीम अन्सारी हे बांधकाम व्यावसायिक समाजसेवाही करतात. सक्रिय समाजसेवेमुळे त्यांचे भिवंडीत काहींशी वैर निर्माण झाले होते. या वैरातून ८ जुलै २०१६ रोजी खंडुपाड्यातील एका हॉटेलसमोर चौघांनी मोहम्मद शाहीद यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. लोखंडी रॉडने त्यांच्या दोन्ही हात आणि पायावर एकापाठोपाठ एक वार केले. या मारहाणीत मो. शाहीद यांना गंभीर दुखापत झाली. फैसल अन्सार सिद्दीकी, रिजवान अहमद शकील शेख, निजामुद्दीन अब्दुल रहेमान सिद्दीकी आणि साजू समीर सिद्दीकी यांच्याविरुद्ध ९ जुलै २०१६ रोजी शांतीनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी फैसल अन्सार सिद्दीकी आणि रिजवान अहमद शकील शेख यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. निजामुद्दीन अब्दुल रहेमान सिद्दीकी आणि साजू समीर सिद्दीकी हे अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.ठाणे न्यायालयात न्या. आर.एस. पाटील यांच्यासमोर शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्या वेळी आरोपींविरुद्ध साक्ष नोंदवण्यासाठी मो. शाहीद हजर झाले. दोन्ही पायांना प्लास्टर असल्याने मो. शाहीद चालू शकत नाही. त्यामुळे ते स्ट्रेचरवर झोपून न्यायालयासमोर हजर झाले. साक्ष नोंदवताना त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला. सहायक सरकारी वकील विनीत कुळकर्णी आणि अॅड. सुनील लसणे यांनी या वेळी काम पाहिले. प्लास्टर लावलेल्या अवस्थेत स्ट्रेचरवर झोपून नोंदवलेली साक्ष चर्चेचा विषय होती.
साक्ष नोंदवण्यासाठी साक्षीदाराची चक्क स्ट्रेचरवर हजेरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 1:59 AM