मुंब्रा : कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्यासाठी शनिवारी पहाटे खाडीत उडी मारलेल्या महिलेला मुंब्रा अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी सुखरूप खाडीबाहेर काढले.
ज्योती उपाध्याय (२८, रा. रिद्धी-सिद्धी गॅलेक्सी टाॅवर, काल्हेर, भिवंडी) हिने शनिवारी पहाटे ५ वाजता कशेळी पुलावरून खाडीत उडी मारली. खाडीत पाण्याचा प्रवाह कमी असल्याने ती वाहत कशीबशी रेतीबंदरपर्यंत पोहोचली. ती जीव वाचवण्यासाठी आक्रोश करत असल्याचे काही नागरिकांच्या निर्दशनास आले. याबाबतची माहिती त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. काही वेळातच घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बोट व स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तिला सुखरूप खाडीबाहेर काढल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे प्रमुख अधिकारी संतोष कदम यांनी दिली. दरम्यान, कायदेशीर कारवाईची पूर्तता करून तिला नारपोली पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी ‘लोकमत’ला दिली.