ठाणे : औरंगाबादहून ठाण्यात भेटण्यासाठी आलेल्या आई-वडिलांना नवऱ्याने पाहुणचारासाठी आग्रह न केल्याच्या रागातून तरुणीने आत्महत्या केली आहे. रविना बाबासाहेब राऊत (२२) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. रविवारी ज्ञानेश्वरनगरात तिने आत्महत्या केली.
पंचपरमेश्वर चाळीत रविना आणि बाबासाहेब हे दाम्पत्य वास्तव्याला आहे. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला आहे. त्यांच्यात २ मे रोजी क्षुल्लक कारणावरून आधीच वाद होता. त्याचवेळी औरंगाबाद येथून रविनाचे आईवडिल तिला भेटण्यासाठी आले. त्यावेळी नवरा त्यांच्याशी फारसे काही बोलला नाही.
शिवाय, त्यांना जेवण किंवा राहण्यासाठीही आग्रह केला नाही. त्यामुळे ते दुस-या दिवशी गावी निघून गेले. यातून पुन्हा या दाम्पत्यामध्ये ४ आणि ५ मे रोजी वाद झाला. याच वादातून ती शनिवारी रात्री उंदीर मारण्याचे विष प्यायली. पण ते तिने पतीला न सांगता रात्री केवळ अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. दवाखान्यात जाण्यासही तिने नकार दिला. दुस-या दिवशी त्रास वाढल्यावर सकाळी ते स्थानिक खासगी रुग्णालयात गेले. तेव्हा डॉक्टरांना मात्र तिने विष प्यायल्याचे सागितले. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असतांनाच रविवारी रात्री तिचा मृत्यू झाला.
घरात आई-वडिलांना राहण्यासाठी आग्रह न केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता, अशी माहिती चौकशीत समोर आल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.