उल्हासनगर : कॅम्प नं-४, सुभाष टेकडी, महात्मा फुले कॉलनी येथे राहणाऱ्या २७ वर्षीय स्वाती सोनकांबळे या महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. आमदार बालाजी किणीकर यांनी परिसराची पाहणी करून कारवाईची मागणी केली आहे.
उल्हासनगरात व्हायरल ताप व सर्दी खोकल्याची साथ सुरू असून खाजगी दवाखाने रुग्णांनी फुल झाले आहे. मात्र महापालिकेकडे याबाबत नोंद नसल्याचा आरोप होत आहे. सुभाष टेकडी महात्मा फुले कॉलनीत राहणाऱ्या स्वाती सोनकांबळे या महिलेला थंडी वाजून ताप आला होता. सुरवातीला रक्त तपासणीत डेंग्यू नव्हता. मात्र धनवंतरी रुग्णालयात उपचार करीत असताना, रक्त तपासणीत डेंग्यू निघाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. शुक्रवारी सकाळी स्वाती सोनकांबळे या महिलेचा मृत्यू झाला. महापालिकेच्या वैधकीय अधिकारी डॉ मोहिनी धर्मा यांनी संशयित महिलेचे रक्ताचे नमुने शासकीय प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असून त्यानंतर खरा अहवाल मिळणार असल्याची प्रतिक्रिया दिली. आरोग्य विभागाने डेंग्यू रुग्णांच्या परिसरात औषध फवारणी सुरू केली आहे.
शहरात व्हायरल ताप, सर्दी, खोकला रुग्णांत वाढ झाली असून शासकीय रुग्णालयासह खाजगी दवाखान्यात रुग्णाच्या संख्येत वाढ झाल्याचे , डॉक्टर सांगत आहेत. महापालिका आरोग्य विभागाच्या दफ्तरी १५ मलेरिया रुग्ण व ५० संशयित डेंग्यूच्या रुग्णाची नोंद असल्याची माहिती महापालिका वैधकीय अधिकारी डॉ मोहिनी धर्मा यांनी दिली आहे. महापालिकेकडे स्वतःचे रुग्णालय अध्यापही सुरू झाले नसल्याने, रुग्ण संख्येसाठी खाजगी रुग्णालय, लॅब यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे.