ठाणे : मेट्रोच्या पिलर बांधकामाच्या आधारासाठी खड्डयात लावलेली सुमारे दीडशे ते दोनशे िकलो वजनाची लोखंडी प्लेट अंगावर पडून सुनिता कांबळे (३७, रा. परेरानगर, लोकमान्यनगर पाडा क्रमांक ३, ठाणे) या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद राबोडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
ठाणे शहरात सध्या मेट्रोचे ठिकठिकाणी काम सुरु आहे. मुंबई नाशिक पूर्व द्रूतगती मार्गालगत असलेल्या विवियाना मॉलसमोरील मेट्रोच्या कामाजवळ सुनिता ही महिला ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भंगार आणि कचरा वेचण्याचे काम करीत होती. त्याचवेळी ती मेट्रोच्या पिलरसाठी खोदलेल्या खड्डयात उतरली. या पिलरच्या सुरक्षेसाठी लोखंडी प्लेट लावलेली होती. दोन्ही बाजूला बॅरिकेटींगही होती. ती याठिकाणचा कचरा काढतांना ही लोखंडी प्लेट तिच्या अंगावर पडली. यात तिच्या गळयाला आणि छातीवर दाब आल्याने गुदमरुन तिचा मृत्यू झाला.
तिला प्रणाली (१४) आणि स्रेहा (१६) या दोन मुली आहे. तिच्या पतीचाही काही वर्षांपूर्वी मृत्यू झाल्याने मुलींच्या संगोपनासाठी ती हे कचरा आणि भंगार वेचण्याचे काम करीत होती. आता तिचाही अपघाती मृत्यू झाल्यामुळे मुलींच्या भविष्याचा प्रश्न निमार्ण झाला आहे. या मुलींना मदतीसाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सुनिताच्या नातेवाईकांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर आणि राबोडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातील चार ते पाच कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही लोखंडी प्लेट बाजूला काढून या महिलेचा मृतदेह बाहेर काढला. ठाणे जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली.