ठाणे: वडील, पतीच्या निधनानंतर एकमेव आधार असलेल्या आईच्या उपचारांसाठी कल्याणमध्ये राहणारी एक महिला रिक्षा चालवते आहे. गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या आईला जगवण्यासाठी कल्याणमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय शीतल कांबळे-चव्हाण यांचा संघर्ष सुरू आहे. पहाटे ५ पासून रिक्षा, त्यानंतर पार्ट टाईम नोकरी करुन शीतल परिस्थितीशी दोन हात करत आहेत. मात्र तरीही त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यामुळे त्यांनी समाजाकडे मदतीचं आवाहन केलं आहे. शीतल कांबळे-चव्हाण यांच्या आई शीला कांबळे अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमनं त्रस्त आहेत. दोन महिन्यांपासून त्यांच्यावर ठाण्यातील फिनिक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचं आतापर्यंतचं बिल साडेसहा लाख झालं आहे. रुग्णालयानं शक्य तितकी मदत केली आहे. शीतलदेखील दिवस-रात्र एक करुन मोठ्या मेहनतीनं उपचारांसाठी पैसे गोळा करत आहेत. मात्र उपचारांचा खर्च अतिशय जास्त असल्यानं त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. माय मेडिकल मंत्रा या संकेतस्थळानं शीतल यांच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल वृत्त दिलं आहे. जगण्यासाठी मला आईशिवाय कोणाचाही आधार नाही, अशी भावना शीतल यांनी व्यक्त केली. 'वैद्यकीय चाचणीत आईला स्वाईन फ्लू झाल्याचं निदान झालं. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र त्यानंतर तिला न्युमोनियादेखील झाला. तिच्या यकृताला आणि किडनीला सूज आली. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे आईचे प्राण वाचले,' असं शीतल यांनी सांगितलं. सध्या शीतल पहाटे ५ ते दुपारी ११ रिक्षा चालवतात. त्यानंतर त्या पार्ट टाईम नोकरी करतात. मात्र त्यातून मिळणारं उत्पन्न घरखर्चावर आणि मुलीच्या शिक्षणावर खर्च होतं. त्यामुळे आईच्या उपचारांसाठी मदत करण्याचं आवाहन शीतल यांनी केलं आहे.
आईच्या उपचारांसाठी 'ती' चालवते रिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 12:13 PM