बदलापूर : स्त्री म्हणजे गुलाबाचे रूप आहे. जी काटे असूनही दुसऱ्याला सुगंध देण्याचे काम करीत असते. ‘वर्षभरात पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेता आले नसले तरी कोविड योद्ध्यांच्या रूपाने पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सर्वांनाच घराघरांत झाले, असे मत प्राचार्या डाॅ. वैदेही दप्तरदार यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त साेमवारी सकाळी ११ वाजता आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘महिला विकास मंच’ने कार्यक्रम आयोजित केला हाेता. याप्रसंगी बदलापूर शहरातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना मानपत्र, भेटवस्तू, रंगीबेरंगी रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. सहसचिव पंढरीनाथ बाविस्कर यांनी मनाेगत व्यक्त करून सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या. या वेळी सत्कारमूर्तींच्या वतीने डॉ. कल्पना शर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष जनार्दन घोरपडे व महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष उदय केळकर, सहसचिव पंढरीनाथ बाविस्कर उपस्थित होते. बदलापूरच्या होमियोपॅथी तज्ज्ञ कल्पना शर्मा, डॉ. सुर्वे आचार्य, डॉ. मधुरा दळवी, कविता वाघमारे, माधुरी गोसावी, परिचारिका योगिता सुर्वे, बँकर दीपाली उमरेडकर, महिला पोलीस नाईक वर्षा कदम यांचा सत्कार करण्यात आला.