उल्हासनगर : संततधार पावसाने गोल मैदान परिसरासह शहरातील अनेक भागास तलावाचे स्वरूप आले होते, तर एका दुचाकीच्या शोरूमशेजारी असलेली संरक्षक भिंत कोसळून एक महिला किरकोळ जखमी झाली असून, दोन कार व दोन दुचाकींचे नुकसान झाले.
संततधार पावसामुळे उल्हास व वालधुनी नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे व कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. गोल मैदान, शिरू चौक, आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयासमोरील रस्ता, फर्निचर मार्केट, आयटीआय शाळेसमोरील रस्ता, कैलास कॉलनी, फॉरवर्ड लाइन रस्ता, १७ सेक्शन, उल्हासनगर जुने बस स्टॉप, महादेवनगर, मोर्यानगरी रस्ता आदी ठिकाणी नाले तुंबल्याने तलावाचे स्वरूप आले होते. नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची टीका मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली.
शहरातील राधाबाई चौक, खेमानी परिसरात गटारीचे झाकण उघडे असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. उल्हास व वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी दोन्ही नद्या भरून वाहत आहेत. कॅम्प नं-३ येथील दुचाकीच्या शोरूमजवळील सरंक्षक भिंत कोसळल्याने दोन कार व दुचाकींचे नुकसान झाले, तर एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. १२ जूनपर्यंत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन नेटके यांनी केले आहे. अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, सहायक आयुक्त गणेश शिंपी आदी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.