भिवंडी- प्रेमसंबंधातून महिलेची हत्या झाल्याची घटना सोनाळे गावात १३ सप्टेंबर रोजी घडली होती. मृतदेह खोलीत ठेवून आरोपी बिहार येथे पळून गेला होता.या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात तालुका पोलिसांना यश आले असल्याची माहिती तालुका पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे. ममतादेवी शिवाजी भगत वय ३१ वर्ष असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
सोनाळे गावातील सद्गुरू कृपा इमारती मधील एक बंद खोलीतून दुर्गंधी येण्याची तक्रार शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी केली असता १६ सप्टेंबर रोजी तालुका पोलिसांनी बंद खोलीचा दरवाजा उघडला असता तेथे एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती मात्र संशय बाळावल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठविण्यात आलं होता.शवविच्छेदन अहवालात जबर मार लागल्याने महिलेचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला.
तपासात हत्या झालेली महिला ही लिव्ह अँड रिलेशन मध्ये मागील चार महिन्यांपासून राजकुमाररंजन बाबूलाल पासवान वय ३४ याच्यासोबत राहत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो बिहार येथील मूळगावी निघून गेल्याचे समजले.त्यांनतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व पोलीस पथकातील भालेराव,विशे,भामरे या तपास पथकाने बिहार राज्यातील रतनपूर आंचल निरजगंज येथून राजकुमार पासवान यास अटक केली.चौकशीत त्याने हत्या केल्याची कबुली दिली असून त्यास भिवंडी न्यायालयात हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
मयत महीला ममतादेवी ही पतीला सोडून ओळखीचा मित्र संतोष चौरसिया याच्या सोबत उल्हासनगर येथे राहत असताना तिला कामाची गरज असल्याने संतोषने तीला भिवंडी येथील राजकुमार पासवान याच्याकडे आणून सोडले .राजकुमार पासवान व त्याच्या पत्नी सोबत ती सोनाळे येथे राहत असताना पत्नी गावी निघून गेल्या पासून मागील चार महिने हे दोघे लिव्ह अँड रिलेशन मध्ये एकत्र राहत होते.त्यांच्यात वाद झाल्याने आपल्यातील संबंध पत्नीस व पोलिसांना सांगेल याची भीती मयत ममतादेवी हि राजकुमारला दाखवत होती.१३ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता त्यांच्यात वाद झाला व तो विकोपाला गेल्याने राजकुमार याने ममतादेवी हिचे डोके जमिनीवर आढळून तिची हत्या करून घराचे दार कुलूपबंद करून फरार झाला होता.