कल्याण : आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगार वसाहतीचे पाडकाम गुरुवारी सुरू असताना त्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या महिलेला कंपनीच्या बाऊन्सरने जखमी केल्याची घटना सायंकाळी ५ वाजता घडली आहे. माधुरी आव्हाड असे तिचे नाव असून, तिला केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर, अन्य दोन महिलाही किरकोळ जखमी झाल्या आहेत.
एनआरसी कंपनी व्यवस्थापनाने आर्थिक कारणावरून २००९ मध्ये कंपनीला टाळे ठोकले असून, साडेचार हजार कामगारांना त्यांची थकीत देणी दिलेली नाहीत. कंपनी लिलावात अदानी उद्योग समूहाला विकली गेली आहे. थकीत देण्याचा विषय न्यायालय आणि नॅशनल ट्रीब्यूल कंपनी लॉच्या दिल्ली पिठीकडे प्रलंबित आहे. कंपनीच्या कामगार वसाहतीतील घरे तोडण्याचे काम दोन महिन्यांपासून अदानी उद्योग समूहाकडून सुरू आहे. तर, थकीत देणी देण्याच्या मागणीसाठी ३३ दिवसांपासून कंपनी प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. घरांचे पाडकाम पुन्हा सुरू झाल्याची माहिती मिळताच आंदोलनातील माधुरा व अन्य महिलांनी तेथे धाव घेतला. त्यावेळी तेथे कंपनीच्या बाऊन्सरकडून धक्काबुक्की झाली. त्यात माधुरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर, अन्य दोघी किरकोळ जखमी झाल्या. माधुरी यांना एनआरसी कामगार संघर्ष समितीचे भीमराव डोळस यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी डोळस यांनी पोलिसात तक्रार देण्यासाठी धाव घेतली आहे.
दरम्यान, यापूर्वीही कंपनीतील पाडकामाला विरोध झाला आहे. त्यावेळीही २५ कामगार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कामगारांच्या धरणे आंदोलनास पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली होती. यावेळी पोलिसांनी जबरदस्ती करून कामगारांच्या विरोधात कारवाई करू नये, असे सूचित केले होते. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कामगार कल्याण आयुक्तांकडून कंपनी जागा विक्रीचा वस्तूस्थिती दर्शक अहवाल मागविला आहे. या उपरही कामगार व अदानी उद्योग समूहसह पोलीस यांच्यात संघर्ष सुरू आहे.
-----------------------