लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई महापालिकेमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली धीरज चव्हाण (३०, रा. शास्त्रीनगर, ठाणे) याच्यासह पाच ते सहा तरुणांना निकिता सावंत या महिलेने साडेतीन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी तिच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.धीरज चव्हाण हे ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरीला आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आलेल्या निकिता सावंत हिच्याशी त्यांची ओळख झाली. तिने मुंबई महापालिकेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचा दावा चव्हाण यांचे सहकारी मनोज पुजारी यांच्याकडे केला. याच ओळखीतून एखाद्याला मुंबई महापालिकेमध्ये नोकरी लावून देऊ शकते, असा दावाही तिने केला. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मनोजने डिसेंबर २०१८ मध्ये निकिता हिच्या अन्नपूर्णा कॅटरर्स या बँक खात्याच्या नावाने ५० हजारांचा धनादेश, तर तीन हजार रुपये रोख असे ५३ हजार रुपये तिला दिले. त्यानंतर, आणखीही कोणाला गरज असेल, तर नोकरी लावण्याची आपली तयारी असल्याचा दावा तिने मनोजकडे केला. तिचा हा प्रस्ताव आल्यानंतर धीरज चव्हाण यांनीही तिला नोकरीसाठी ५० हजार रुपये दिले. मुंबई महापालिकेतील बांधकाम विभागामध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष तिने धीरजला दाखविले. त्यानंतर, प्रतिज्ञापत्र करण्याच्या नावाखाली त्याच्याकडून साडेतीन हजार रुपये, असे एकूण ५३ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर, मनोजने सुब्रह्मण्यम नाईकर, सेंथलीकुमार नाईकर, विशाल वाल्मीकी यांनाही नोकरीला लावण्यास निकिताला सांगितले. या चौघांनीही तिला प्रत्येकी ५० हजार रुपये दिले. तिला या प्रत्येकाने नंतर नोकरी आणि पैशांबाबत विचारणा केली असता, आपल्याशी याबाबत फक्त मनोज बोलेल, असे तिने सुनावले. परंतु, नंतर मनोज याचाही फोन तिने घेतला नाही. १६ मे २०१९ रोजी तिने लोकसभा निवडणुकीचे निमित्त साधून त्यात व्यस्त असल्याचे सांगितले. निवडणुकीनंतर आॅफर लेटर देण्यात येईल, असा दावाही तिने केला. मात्र, त्यानंतर तिने फोन बंद करून संवाद साधणेही बंद केले. तिने अशाच प्रकारे मानपाडा येथील आरती कांबळे या भाजीविक्रेत्या महिलेलाही मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. तिच्याकडूनही तिने ५३ हजारांची रक्कम उकळली. वारंवार संपर्क साधूनही तिने प्रतिसाद न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे या सर्वांच्या लक्षात आले. आपली तीन लाख ५९ हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार या सर्वांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात केली. त्यानुसार, निकिता सावंत हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.