कसारा : सकाळी शेतात काम करत असताना अनसूया डगळे यांना साप चावला. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या भावाने या महिलेस कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे उपस्थित डॉ. रानडे यांनी तात्पुरते उपचार करून त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले.
बहिणीची प्रकृती ढासळत असल्याने डगळे यांचे भाऊ दत्ता वातडे यांनी रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिकेची मागणी केली. परंतु, डॉ. रानडे यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत वातडे यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच तुम्ही १०८ ला फोन करा आणि पेशंट घेऊन जा, असा सल्लाही दिला. गाडी तसेच रुग्णवाहिका नसल्याने वातडे यांनी बहिणीला चक्क मोटारसायकलवर बसवून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तेथेही डॉक्टरांनी प्रथमोपचार केले आणि पेशंटला ठाणे सिव्हिलला घेऊन जाण्यास सांगितले. शहापूर येथून १०८ ने रुग्ण महिलेला ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू झाले आहेत.दरम्यान, या महिलेस तीन तास योग्य उपचार न मिळाल्याने तिची प्रकृती ढासळली असल्याने २४ तास अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार असल्याचे रु ग्णालय प्रशासनाने सांगितले. दरम्यान, पावसाळ्यात ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना नेहमीच वाढत्या असतात. अशावेळी त्यावर तातडीने उपचार होणे फार गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांच्या जीवावर बेतू शकते.साप चावलेल्या महिलेची प्रकृती स्थिर वाटत नसल्याने तसेच कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जागेचा अभाव असल्याने या महिलेस शहापूर उपजिल्हा आणि तेथून ठाणे सिव्हिलला दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली योग्य उपचार सुरू आहेत.- डॉ. मनीष रेगे,जिल्हा आरोग्य अधिकारीसाप चावलेल्या महिलेवर मी स्वत: पाऊण तास उपचार करत होतो. पेशंटची प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना शहापूर येथे घेऊन जाण्यास सांगितले. मी स्वत: १०८ ला फोन केला. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. आम्ही पेशंटला पूर्णपणे सहकार्य केले आहे. - डॉ. रानडे, कसारा प्राथमिक आरोग्य केंद्र