ठाणे : प्रसूतीची वेळ आली नसल्याचे कारण देऊन वेदनेने विव्हळणाऱ्या गर्भवतीला दोनदा उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातून हाकलवून लावले. त्यानंतर तिची घरी प्रसूती झाल्याची घटना ताजी असताना, सोमवारी रात्री ठाण्यात एका गर्भवतीला एका रु ग्णालयातून दुस-या आणि तेथून तिस-या रुग्णालयात पाठवल्याने तिची वाटेत रिक्षातच प्रसूती झाली. मुलीला जन्म दिल्यानंतर रिक्षाचालकाने त्या मायलेकीना रुग्णालयात दाखल केले. बाळ-बाळंतिणीची प्रकृती स्थिर असून या महिलेची ही दुसरी नॉर्मल प्रसूती आहे. वेदना सुरू झाल्याने या महिलेचा नवरा चार वर्षीय मुलास घेऊन रिक्षाचालकाच्या मदतीने ५ ते ६ किलोमीटर एका रुग्णालयातून दुसºया रुग्णालयात फिरत होता.ठाण्यातील कोलबाड येथील सौरभ टॉवरमध्ये मूळ नेपाळ येथील रहिवासी असलेला जनक जोशी हे त्या सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. तसेच ते तेथेच आपल्या पत्नी आणि मुलासह राहतात. त्याची पत्नी गीता हिला सोमवारी रात्री प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर तेथील रिक्षाचालक मंगेश जाधव यांनी लॉकडाउन सुरू असतानाही माणुसकीच्या नात्याने आपली रिक्षा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यासाठी काढली. जाधव हे त्या दाम्पत्यासह चार वर्षीय मुलासोबत एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात आले. मात्र, सध्या त्या रु ग्णालयात कोविड १९ च्या रुग्णांवर उपचार केले जात आहे. त्यामुळे त्यांना ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यास सांगितले. हे रुग्णालय दीड किलोमीटर अंतरावर असल्याने जाधव यांनी रिक्षा वळवली; परंतु तेथे गेल्यावरही त्यांना कोपरीतील ठामपाच्या लखिचंद्र फतीचंद्र रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी तेथून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रु ग्णालयाकडे रिक्षा वळवली. रिक्षाचालकाने सिडको येथून शॉर्टकटने घेतली; परंतु चेंदणी कोळीवाडा येथील रेल्वे लाइनखालील पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे रिक्षा वळवून ती शहराच्या मध्यवर्ती भागातून कोपरीकडे धावू लागली. कोपरी ब्रिजवर गीता यांना वेदना जास्त होऊ लागल्याने दगदग झाली असावी, असे समजून रिक्षाचालकाने रिक्षा बाजूला घेतली. याचदरम्यान गीताने मुलीला जन्म दिला. यावेळी जनक हे तिच्यासोबत होते. त्यानंतर त्या मायलेकींना रुग्णालयात दाखल केले. आता त्या दोघींची प्रकृती स्थिर आहे.>आपली ही दुसरी नॉर्मल प्रसूती असून पहिला मुलगा आहे. तर आता मुलगी झाली असून सध्या तब्येत व्यवस्थित आहे.- गीता जोशी, प्रसूती झालेली महिला.>कोविडमुळे कळवा रु ग्णालयातील प्रसूती विभाग बंद ठेवला आहे. तसेच तेथील डॉक्टरांना क्वारंटाइन केले आहे. त्यामुळे त्यांना कळवा रु ग्णालयातून कोपरीला पाठवले होते. आता त्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे तेथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.- संदीप माळवी, उपायुक्त व जनसंपर्क अधिकारी, ठामपा.