ठाणे - कोकण कन्या एक्स्प्रेसने मुंबई येणाऱ्या 20 वर्षीय पूजा मुन्ना चौहान या महिलेला प्रवासादरम्यान प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्या महिलेला ठाणेरेल्वे स्थानकात उतरविण्यात आले. तसेच त्या स्थानकातील वन रूपी क्लिनिक या प्रथमोपचार केंद्रात तिची सुखरुप प्रसूती शनिवारी (27 एप्रिल) सकाळी 5.40 वाजण्याच्या करण्यात येथील डॉक्टरांना यश आले. चौहान या महिलेला मुलगा झाला असून ते दोघेही सुखरुप आहेत. त्यांना उपचारार्थ ठाणे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शनिवारी सकाळच्या सुमारास ठाणे स्थानकात येणाऱ्या कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये एका महिलेला प्रसूतीच्या वेदना होत असल्याची माहिती ठाणे स्टेशन मास्तर कार्यालयाकडून क्लिनिकमध्ये देण्यात आली. तात्काळ येथील नर्स पूजा आणि डॉक्टर ओमकार यांनी स्टेशन मास्तर पी के प्रधान आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. त्या महिलेला स्ट्रेचरवरुन आणण्यात आल्यावर तिची सुखरूप प्रसूती केली. अशाप्रकारे या प्रथमोपचार केंद्रातील या महिन्यातील दुसरी तर ठाण्यातील चौथी तसेच मुंबई मधील सातवी प्रसूती घटना असल्याची माहिती क्लिनिकचे डॉक्टर राहुल घुले यांनी दिली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातील क्लिनिकमध्ये याआधी काही दिवसांपूर्वी महिलेची प्रसूती झाली असून आई आणि बाळ दोन्ही सुखरूप होते. प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती होण्यासाठी जात असताना एका 23 वर्षीय विवाहितेला लोकल प्रवासादरम्यान प्रसूती वेदना सुरु झाल्याने त्या ठाणे रेल्वे स्थानकात उतरल्या. त्यानंतर स्थानकावरील वन रूपी क्लिनिकमध्ये त्यांची प्रसूती करण्यात आली असून त्यांनी एका मुलीला जन्म दिला होता. मंगळवारी (22 ऑगस्ट) रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
हरजीत कौर (22) असे महिलेचे नाव असून ती दिवा येथील रहिवासी होती. मंगळवारी रात्री प्रसूतीच्या वेदना सुरु होत असल्याने कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नातेवाईकांसह ती जात होती. लोकल प्रवासात वेदना जास्त होऊ लागल्याने तिला तातडीने ठाणे रेल्वे स्थानकावरील क्लिनिकमध्ये नातेवाईक, प्रवासी , रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने नेण्यात आले. हरजीतने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. 9 महीने पूर्ण झाल्यामुळे महिलेची नॉर्मल प्रसूती झाल्याची माहिती क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांनी दिली होती. याआधी कळवा आणि दिवा रेल्वे स्थानकात प्रसूतीच्या घटना घडल्या आहेत.