ठाणे : प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच पैसे पुरवण्यास नकार दिल्याने फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर महिलेचे फोटो व्हायरल करणाºया व्यंकटेश पेंटा (२४, रा. बोरिवली) याला अवघ्या सहा तासांमध्ये अटक करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले. त्याला ५ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कासारवडवली भागात राहणाºया २५ वर्षीय महिलेशी आधी मैत्री करून नंतर तिला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. याचाच गैरफायदा घेऊन त्याने तिच्याकडे ७० हजार रुपयांची मागणी करून ते त्याच्या बँक खात्यात भरण्यास तसेच रोख स्वरूपात देण्यास भाग पाडले. त्याच्याकडून वारंवार होणाºया शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे तसेच दिवसेंदिवस त्याची पैशांचीही मागणी वाढत असल्याच्या कारणावरून या महिलेने त्याच्याशी प्रेमसंबंध तोडले होते. त्याच्याशी प्रेमसंबंध तोडल्याने आणि पैसे पुरवण्यास नकार दिल्याच्या कारणावरून व्यंकटेश याने फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या दोघांचे काही खासगी फोटोही व्हायरल केले. फोटो व्हायरल करून त्याने बदनामी केल्याने याप्रकरणी तिने ३० जुलै २०१९ रोजी विनयभंग, खंडणी उकळणे, बदनामी करणे आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. त्याच्याशी पुन्हा प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यासाठी तसेच पैशांच्या मागणीसाठी या महिलेकडे तो वारंवार संपर्क करत होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप उगले, निरीक्षक वैभव धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव, उपनिरीक्षक विनायक निंबाळकर, पोलीस हवालदार राजेंद्र चौधरी, सुजित खरात, विश्वनाथ ध्रुवे आणि मनोजकुमार पवार आदींच्या पथकाने त्याला ३१ जुलै रोजी अटक केली. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली असून या संपूर्ण प्रकारामध्ये त्याचा सक्रिय सहभाग असल्याचेही उघड झाले. त्याने आणखी काही महिलांना अशाच प्रकारे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली का? आणखी कोणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल केले आहे का, याबाबत तपास सुरू असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.