मीरारोड - खोटी सोनसाखळी विक्रीसाठी सराफा दुकानात गेलेल्या ठक महिलेसह तिच्या पुर्वीच्या पतीला सराफाच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात भाईंदर पोलीसांना यश मिळाले आहे. तिच्या पूर्वीच्या पतीवर चोरीचे ४ गुन्हे दाखल आहेत. तर तिच्या कडे दोन पॅनकार्ड सापडली आहेत.भार्इंदर पश्चिमेस राजेश जयंतीलाल जैन यांचे अरिहंत ज्वेर्ल्स नावाने सराफा दुकान आहे. त्या दुकानात महिला सोन्याची गळ्यातील साखळी विकण्यासाठी म्हणुन गेली. शाह यांनी सोनसाखळी खरेदीचे बील विचारले असता सदरची सोनसाखळी आपणास मित्राने भेट दिल्याचे सांगत तो दुबईला असल्याने बील देता येत नाही असे म्हटले. रेखा परमात्मा यादव (२९) असे नांव सांगत आपण नेहरु नगर, भार्इंदर येथे रहात असल्याचे सांगितले.जैन यांना संशय आल्याने त्यांनी सोनसाखळीची तपासणी केली असता ती खोटी असल्याचे आढळले. तसेच सराफांच्या व्हॉटस् ग्रुप वर देखील पैशांची गरज असल्याचे सांगून बील नसताना खोटे दागीने विकून सराफांची फसवणूक होत असल्याचे मॅसेज जैन यांनी पाहिले.महिलेला बोलण्यात गुंतवून जैन यांनी सराफा संघटनेचे अध्यक्ष भवरलाल मेहता यांना महिलेची माहिती दिली. मेहता यांनी त्वरित भार्इंदर पोलीस ठाण्यात फोन करुन तक्रार केली. काही वेळात पोलीस आले व त्यांनी महिलेस ताब्यात घेतले.तिच्या कडे रेखा परमात्मा यादव तसेच रेखा जयानंद मंडल या नावाचे देखील पॅन कार्ड सापडले. तिच्या सोबत जयानंद उर्फ प्रकाश मंडल (३२) रा. रश्मी सीटी, नायगाव हा तिचा पूर्वीचा पती देखील होता.पोलिसांनी दोघाही आरोपींना अटक केली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरु आहे. मंडल वर कार, लॅपटॉप चोरी एकूण ४ गुन्हे भार्इंदर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तो नुकताच जेल मधुन सुटून आला होता असे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे म्हणाले.
खोटे दागिने विक्रीसाठी आलेल्या महिलेसह तिच्या माजी पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 10:34 PM