ठाणे : कळव्यात एकतर्फी प्रेमातून केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणीवर आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, तसेच या प्रकरणी गावठी कट्टा विकणाऱ्यास ठाणे पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. मात्र, तो अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. गोळीबार करणाऱ्या कमलकांत सैनीला न्यायालयीन कोठडी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मूळचा राजस्थानमधील डवसा जिल्ह्याचा कमलकांत आणि कळव्यातील जखमी तरुणीची एका लग्न सोहळ्यात ओळख झाली. याच दरम्यान, तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. रेल्वे बोर्डाची परीक्षा देण्यासाठी कमलकांत कळव्यातील मामेबहिणीकडे आला होता. त्याच परिसरात ती तरुणी राहत असल्याने, त्याने तिला तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. मात्र, तिने नकार दिल्याने १८ मार्चला कमलकांतने तिच्यावर गोळी झाडली. यामध्ये ती सुदैवाने बचावली. मात्र, ती गोळी तिच्या जबड्याजवळ अडकल्याने तिला बोलण्यास त्रास होत आहे. त्यामुळे तिच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. सद्य:स्थितीत तिची प्रकृती स्थिर असून, शस्त्रक्रिया झाल्यावर घरी सोडले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, कमलकांतने तो कट्टा कुठून आणला, याचा शोध पोलीस घेत असताना तो त्याने राजस्थानमधून एका अल्पवयीन मुलाकडून साडेचार हजारांत घेतल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक राजस्थानला गेले होते. त्यांनी त्याला कट्टा विकल्याप्रकरणी अटक केली आहे. त्या अल्पवयीन मुलाने आजोबांचा घरात पडून असलेला कट्टा विकल्याचे समोर आले. मात्र, तो अल्पवयीन असल्याने, त्याची रवानगी भिवंडीच्या बालसुधारगृहात करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांनी दिली. (प्रतिनिधी)
गोळीबार झालेल्या तरुणीवर पुन्हा शस्त्रक्रिया
By admin | Published: April 04, 2016 3:04 AM