अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाड पाडा परिसरात एका बंद घरात कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. भागुबाई चाळीत काही दिवसांपूर्वी मृत महिला आणि एक व्यक्ती भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहात होते. मात्र, हे घर बंद होते. शिवाय त्यातून दुर्गंधी येत असल्याने नागरिक हैराण झाले होते. दरम्यान, घरमालकाने नागरिकांच्या मदतीने कुलूप तोडून पाहिले असता, या महिलेचा मृतदेह आढळून आला. त्याने तत्काळ याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. या महिलेचा पती फरार झाला असून, ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नराळे, पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले असून, ही हत्या आहे की, आणखी काय, याचा छडा लावून आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांसमोर उभे राहिले आहे. महिलेचा मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
--------