टोकावडे : मुरबाडच्या पारतळे या गावाची नळपाणीपुरवठा योजना काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप आहे. नागाव ग्रुपग्रामपंचायतीतील पारतळे गावात नळपाणीपुरवठा योजना सुरू होती. काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचे काही पाइप चोरीला गेले होते.याबाबत, ग्रामपंचायतीत ठराव केला. त्यानंतर, दुरु स्तीचे काम करण्यात आले. मात्र, दुरु स्तीचे काम पूर्ण न करता सरपंच आणि ग्रामसेवकाने संगनमताने दुरु स्तीचे पैसे हडप केल्याच्या गंभीर आरोप उपसरपंच व ग्रामस्थांनी केला आहे. पारतळे गावची नळपाणीपुरवठा योजना बंद झाल्याने महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत असून पिण्याचे पाणीदेखील विकत घ्यावे लागत असल्याने महिला संतप्त आहेत. अशुद्ध पाणी प्यायची वेळ आल्याने आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. आपल्यावर केलेले आरोप पूर्णत: खोटे असून पाणीपुरवठा योजनेत कोणताही भ्रष्टाचार झाला नसून ती लवकरात लवकर सुरू होईल, असे सरपंचांनी सांगितले. (वार्ताहर)
पाणी योजना बंद असल्याने महिला संतप्त
By admin | Published: February 22, 2017 6:05 AM