कल्याण : केडीएमसीच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला भाजपने काँग्रेस आणि मनसेच्या मदतीने धक्का देत सभापतीपद पटकावले असतानाच दुसरीकडे महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याने शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या उमेदवार वीणा जाधव यांचा सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी एकमेव अर्ज दाखल झाला होता. प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने त्यांची निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. मात्र, शुक्रवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले.महिला बालकल्याण समितीमध्ये शिवसेनेचे पाच, भाजप चार आणि काँग्रेस व मनसे प्रत्येकी एक, असे ११ सदस्य आहेत.सभापतीपदासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी जाधव यांचा एकमेव अर्ज आला होता. मागील सभापतीपद भाजपकडे होते. परंतु, यंदा त्यावर शिवसेनेचा दावा होता. मात्र, राज्यातील सत्तांतरात उदयास आलेली महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षात बसलेली भाजप, यामुळे केडीएमसीतील समित्यांच्या निवडणुकांना वेगळीच रंगत आली आहे. त्याची प्रचीती स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी अर्ज भरताना आली. शिवसेना आणि भाजपने येथे एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. हेच चित्र महिला बालकल्याण समिती सभापतीपदाच्या वेळी दिसून येईल, अशी शक्यता होती. परंतु, भाजप वा अन्य पक्षाने अर्ज भरले नाहीत. मात्र, शिवसेनेकडून जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच त्यांची बिनविरोध निवड झाली होती.दरम्यान, शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे हे उपस्थित होते. जाधव यांची बिनविरोध निवड होण्यापूर्वी त्यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी झाली. यात त्यांचा अर्ज वैध ठरला. यानंतर नियमाप्रमाणे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना १० मिनिटांचा अवधी दिला गेला. मात्र, जाधव यांनी माघार घेतली नाही. अखेर, जाधव यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले.या निवडणुकीच्या वेळी ११ पैकी सात सदस्या उपस्थित होत्या. सभापतीपदी बिनविरोध निवडून आलेल्या जाधव यांचे महापौर विनिता राणे, विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, सभागृहनेते श्रेयस समेळ आणि समितीमधील सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.प्रलंबित कामांची पूर्तता करण्यावर देणार भरवीणा जाधव या आधीही महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या राहिल्या आहेत. या अनुभवाचा फायदा सभापतीपदाचा कार्यभार सांभाळताना होईल, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.महिला आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी भरघोस काम करेन. जी प्रलंबित कामे आहेत, त्यांची पूर्तता करण्यावरदेखील माझा भर असेल, असे जाधव म्हणाल्या.
महिला बालकल्याण समिती शिवसेनेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:16 AM