- पंकज रोडेकर ठाणे : दिवसेंदिवस बदलत चाललेली जीवनशैली, वाढता मानसिक ताणतणाव तसेच लहानमोठ्या घरगुती कारणांतून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेगवेगळ्या घटनांमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेल्या ८७ जणांचे प्राण वाचवण्यात जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मागील आठ महिन्यांत यश आले. समुपदेशन करून त्यांना जीवन जगण्याची नवी दिशा देण्याचे कामही येथे केले जात आहे. जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेण्यामध्ये महिलांचे प्रमाण दुपटीपेक्षाही जास्त आहे.आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटनांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या पूर्वसंध्येला शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत आत्महत्येचा प्रयत्न करणाºया ३०६ जणांचे प्राण वाचवण्यात आले होते. ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाºयांकडून रूग्णांसोबत जिव्हाळ्याचे नाते जपले जाते. बदलती जीवनशैली आणि स्पर्धात्मक युगाच्या जाळीत प्रत्येकाचे जीवन एका माशाप्रमाणे अडकत चालले आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून होणारा अपमान, प्रेमभंग किंवा एखादी गोष्ट मनासारखी न मिळाल्यास ताणतणाव वाढतो. त्यातून तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. आत्महत्येचे प्रकार वेगवेगळे असतात. कुणी उंदीर मारण्याचे विषारी औषध किंवा फिनेलसारखे द्रव्य प्राशन करतो. अशा प्रकारे आत्महत्येचा प्रयत्न केलेले रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाल्यावर त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. एवढेच नव्हे तर या रु ग्णांचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दीक्षा रोहिल्ला, जिनी पटणी, परिचारिका गौतमी म्हसकर, जयश्री श्रीधनकर व समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय व मनोविकृती) श्रीरंग सिद हे समुदेशन करतात. त्यांना आशेचा नवीन किरण दाखवण्याचे मोलाचे काम ही मंडळी करते.
आत्महत्येचा निर्णय घेणाऱ्यांमध्ये महिला जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 3:07 AM