मीरा रोड : पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कंटाळलेल्या मीरा रोडच्या सिल्व्हर सरिता वसाहतीतील महिलांनीच चार बंगल्यांतील पाणीचोरी उघड केली. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने चार मोटारपंप जप्त केले असून अद्याप गुन्हे दाखल केलेले नाहीत. झंकार कंपनी, विनयनगरमागे सिल्व्हर सरिता ही १३ इमारतींची जुनी वसाहत असून या ठिकाणी सहा बंगलेही आहेत. तीन ते चार वर्षांपासून इमारतींना पाणी कमी दाबाने मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. सुरुवातीला पाणीपुरवठा विभागाचा व्हॉल्व्हमन हा मुद्दाम व्हॉल्व्ह कमी उघडत असावा, जेणेकरून पाणी कमी येत असल्याचा महिलांना संशय होता. महिलांनी वेळोवेळी व्हॉल्व्हमनला जाबही विचारला तसेच समोर उभे राहून त्याला व्हॉल्व्ह उघडायला लावत. पण, त्यानंतरही पाणी कमीच येत असल्याने येथील बंगल्यांमध्ये मोटारपंप लावून पाणी खेचले जात असल्याची कुणकुण रहिवाशांना लागली. अजित सावंत आणि अन्य रहिवाशांनी पालिकेकडे तक्रारी केल्या. पण, पालिकेचे कर्मचारी येणार, याची कुणकुण आधीच पाणीचोर बंगलेधारकांना लागायची व ते मोटार काढून ठेवायचे. पाणीटंचाई व पाणीचोरीला त्रासलेल्या सिल्व्हर सरिता महिला मंडळाच्या पूजा सावंत, उषा बोकारे, अक्षता देशपांडे, अर्चना पाल यांनी शनिवारी सकाळी पाणी येण्याच्या वेळेतच बंगल्यांच्या आवारात धडक दिली. या वेळी चार बंगल्यांमध्ये पंपाने पाणी खेचत असल्याचे दिसले. महिलांनी अन्य रहिवाशांना याची माहिती दिली. स्थानिक नगरसेविका सुजाता शिंदे व रहिवाशांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागास हा प्रकार कळवल्यावर पालिकेचे कर्मचारी धावून आले. त्यांनी चार पंप जप्त करून नेले. (प्रतिनिधी)एका बंगल्यात २५ ते ३० जण भाड्यानेयेथील एकेका बंगल्यात २५ ते ३० जण भाड्याने राहतात. एका स्थानिक इस्टेट एजंट तथा राजकीय पदाधिकाऱ्यासह पालिकेच्या आशीर्वादाने पाणीचोरी होत असल्याचा आरोप अक्षता देशपांडे यांनी केला.
महिलांनीच उघड केली पाणीचोरी
By admin | Published: February 20, 2017 5:41 AM